रुग्णांच्या संख्येत दीडपट वाढ!
By admin | Published: July 15, 2017 12:08 AM2017-07-15T00:08:11+5:302017-07-15T00:08:11+5:30
दवाखाने हाऊसफुल्ल : विविध आजार बळावले, नागरिक हैराण
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, येथील शासकीय सामान्य रुग्णालयासह खासगी दवाखाने हाऊसफुल्ल झालेले आहेत. सामान्य रुग्णालयात नेहमीपेक्षा दीडपट अधिक रुग्णांची नोंद दररोज होत असल्याचे आढळून आले आहे.
पावसाळी वातावरणाचा परिणाम आरोग्यावर होत असतो. प्रामुख्याने ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, अशी लहान मुले, महिला व वृद्धांना बदलत्या वातावरणाचा सामना करताना विविध त्रास सहन करावे लागतात. यातूनच जून-जुलै महिन्यात पावसाचे आगमन झाले की, सर्दी, खोकला, ताप, पोटाचे विकार आदी रोग डोके वर काढतात. यावर्षी पाऊस नियमित पडत नसला तरी ढगाळ वातावरणामुळे विविध आजार बळावलेले दिसत आहेत.
यामध्ये वरील आजारांसह उलटी, हगवण, व्हायरल फ्लू, हात-पाय दुखणे, अंगदुखी आदींचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. त्यामुळे सामान्य रुग्णालयासह खासगी दवाखान्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येते. सामान्य रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात एरव्ही ४०० ते ५०० रुग्णांची नोंद दररोज होत असते; परंतु या आठवड्यात सोमवारपासून रुग्णसंख्या ७०० च्या जवळपास राहत असून, यात दीडपट वाढ झालेली दिसते. सोमवारी बाह्यरुग्ण विभागात नोंदणी झालेल्या एकूण रुग्णांची संख्या तब्बल ९५१ होती. तर मंगळवारी ७६८, बुधवारी ७६१, गुरुवारी ५७१ तर शुक्रवारी ६५४ रुग्णांची नोंद झाली. यावरून रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. खासगी रुग्णालयांमध्येही रुग्णांची गर्दी दिसत असून घरोघरी ताप, सर्दी, खोकला व इतर रुग्ण आढळून येत आहेत.