रेफर टू बुलडाणामुळे रुग्ण त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:37 AM2021-04-28T04:37:28+5:302021-04-28T04:37:28+5:30
शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा मिळाव्या, या उद्देशाने शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात प्रशस्त ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती ...
शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा मिळाव्या, या उद्देशाने शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात प्रशस्त ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती केली आहे, तसेच येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांना राहण्याच्या सोयींसह इतर सुविधा पुरविण्यात येत आहेत, परंतु येथील वैद्यकीय अधिकारी तथा कर्मचारी येथील रुग्णांना सेवा देण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरत आहेत. या रुग्णालयात शहरासह ग्रामीण भागातून प्रसूतीसाठी महिलांचे दाखल होण्याचे प्रमाण खूप आहे, परंतु येथे प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलांपैकी प्रसूती होण्याचे प्रमाण हे खूपच कमी आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात महिलांना प्रसूतीसाठी दाखल केल्यानंतर, त्या महिलांना तथा त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाइकांना येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून महिलांची कोणत्याही प्रकारे तपासणी न करता सरळ बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी जाण्याचा सल्ला दिला जात आहे, तसेच प्रसूतीसाठी अडचणी निर्माण होत असून, नैसर्गिक प्रसूती न झाल्यास आमच्याकडे पुरेसे साहित्य तथा यंत्रणा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देउन ग्रामीण रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी हाेत आहे.