स्प्लीनसह तीन गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून वाचविले रुग्णाचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 06:05 PM2018-11-25T18:05:36+5:302018-11-25T18:22:54+5:30
बुलडाण्याच्या संघरक्षीत रविंद्र वानखेडे (रा. सोळंकी लेआऊट) या युवकावर पुर्णत: खराब झालेल्या स्प्लीन (प्लिहा)सह तीन शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचविल्याची घटना समोर आली आहे.
बुलडाणा: थंड हवेच्या ठिकाणासोबतच दवाखान्यांचे शहर म्हणून अलिकडील काळात पुढे आलेल्या बुलडाणा शहरातील सात डॉक्टरांनी रस्ते अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या १७ वर्षीय बुलडाण्याच्या संघरक्षीत रविंद्र वानखेडे (रा. सोळंकी लेआऊट) या युवकावर पुर्णत: खराब झालेल्या स्प्लीन (प्लिहा)सह तीन शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचविल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अशा प्रकरणात गंभीर जखमी रुग्णास औरंगाबाद येथे पाठविण्याचा पायंडा पडलेला असताना मोठा धोका पत्करून ही अवघड वाटणारी शस्त्रक्रिया पूर्णत्वास नेली आहे. अशा प्रकरणात रुग्णांला वेळेत उपचार न मिळाल्यास अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. दोन जनरल सर्जन, एक अस्थिरोग तज्ज्ञ, तीन भूल तज्ज्ञ आणि रेडीओलॉजीस्ट अशा सात डॉक्टरांनी टीमवर्क करत रुग्ण हाताळल्याने अवघड शस्त्रक्रिया बुलडाण्यात यशस्वी झाली. रस्ते अपघातात हात आणि मांडीचे हाड फ्रॅक्चर झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन जखमीचा रक्तदाब कमी होत होता. रक्त देऊनही तो कमी होत असल्याने रुग्णाचे निदान करणेही अवघड होऊन बसले होते. त्यावेळी सिटीस्कॅन व सोनोग्राफीमध्ये रुग्णाची प्लिहा (स्प्लीन) अपघातात मुक्का मार लागल्याने मोठ्या प्रमाणावर डॅमेज झाल्याने मोठ्या प्रमाणावर पोटात रक्तस्त्राव झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे तो रक्तस्त्राव थांबविण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत स्प्लीन सर्जरी (सुप्रामेजर सर्जरी) करणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे बुलडाण्याचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अशोक भवटे, जनरल सर्जन विजय निकाळे, डॉ. सुनील राजपूत, भूलतज्ज्ञ डॉ. अनिल साळोख, डॉ. अविनाश सोळंकी आणि डॉ. राजेश फालके आणि रेडीओलाजिस्ट डॉ. संजय बोथरा यांच्याशी सल्लामसलत करून त्वरेने सुप्रामेजर शस्त्रक्रिया करून रुग्णांची प्लिहा काढून टाकण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया झाल्याशिवाय मांडी व हाताचे झालेले फ्रॅक्चर पूर्ववत करणे अशक्यप्राय होते. सोबतच रुग्णाच्या जीवालाही मोठा धोका होता. त्यामुळे लगोलग रात्री साडेआठ, नऊ वाजेच्या सुमारासच शस्त्रक्रियेची सर्व तयारी करून सव्वातीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर शस्त्रक्रिया पूर्णत्वास गेली. शस्त्रक्रियेदरम्यान, रुग्णाची पल्सही पूर्णत: गायब झाल्याने डॉक्टरांनी महत्तप्रयास करून पंपींग करत त्याचा रक्तदाब नियंत्रणात आणत शस्त्रक्रिया यशस्वी केली.
काय असते प्लिहा (स्प्लीन)!
शरीरात लिव्हरच्या बाजूला प्लिहा असते. जवळपास दोन लिटर रक्त त्यात साठवून ठेवलेले असते. शरीराच्या एखाद्या भागातून रक्तस्त्राव झाल्यास प्लिहाकडून त्या भागाला रक्तपुरवठा करण्यात येतो. यासोबतच प्लिहाद्वारे माणसाला होणारा संसर्ग रोखण्याचेही काम केल्या जाते. ही प्लिहाच पुर्णत: डॅमेज झाल्याने शस्त्रक्रिया करून रुग्णाचा रक्तस्त्राव थांबविण्याशिवाय डॉक्टरांसमोर पर्याय नव्हता. दरम्यान या रुग्णास आता इन्फेक्शन होण्याचा धोका पाहता येत्या काही दिवसात संसर्ग रोखण्यासाठी त्यास लसही देण्यात येणार आहे.