वनग्राम देव्हारीच्या पूनर्वसनाचा मार्ग मोकळा; उपवन संरक्षकांच्या उपस्थितीत झाली ग्रामसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 04:24 PM2018-07-07T16:24:20+5:302018-07-07T16:26:01+5:30
बुलडाणा : जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १४ किमी अंतरावर असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातील वनग्राम देव्हारीच्या पूनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात सात जुलै रोजी गावामध्ये यासंदर्भात ग्रामसभा घेण्यात आली.
- नीलेश जोशी
बुलडाणा : जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १४ किमी अंतरावर असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातील वनग्राम देव्हारीच्या पूनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात सात जुलै रोजी गावामध्ये यासंदर्भात ग्रामसभा घेण्यात आली. त्यात येत्या दोन दिवसात देव्हारी ग्रामसभा ठराव देणार असल्याची माहिती, वन्य जीव विभागाच्या सुत्रांनी दिली. वन्यजीव विभागाचे अकोला येथील उपवनसंरक्षक मनोजकुमार खैरणार, सहाय्यक वनसरंक्षक, आरएफओ मजुय सुरवशे, तहसिलदार सुरेश बगळे, वनरक्षक, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह ग्रामस्थ या बैठकीस उपस्थित होते. १९६१ मध्ये देव्हारीला गावाचा दर्जा मिळाला होता. दरम्यान, १९९७-१९९८ मध्ये ज्ञानगंगाला अभयारण्याचा दर्जा मिळाला होता. तेव्हापासून या गावाच्या पूनर्वसनाचा प्रश्न प्रलंबीत होता. अंबाबरवा आणि मेळघाटमधील वनग्रामांचे पूनर्वसनाची प्रक्रिया दोन वर्षापूर्वी झाली होती. त्यात अनेक अडचणीही आल्या होत्या. सध्याही त्यात काही अडचणी आहेत. मात्र ज्ञानगंगा अभयारण्यातील बुलडाणा वनपरिक्षेत्रात येत असलेल्या देव्हारी येथील ग्रामस्थ गावाच्या पूनर्वसनासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे येत्या काळात या गावाच्या पूनर्वसनाचा मार्ग मोकळा होणार आहे. केंद्र शासनाचे धोरण, वन्य जीव विभागाचा कायदा आणि सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वनग्रामांचे पूनर्वसन करण्याचे धोरण आहे. त्यातंर्गत ही प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. दरम्यान, देव्हारीसाठी स्वतंत्र गावठाण देण्यासोबतच, ज्ञानगंगा अभयारण्यातील जवळपास ३५० एक्कर जमीन येथील ग्रामस्थ वहिती करीत आहेत. त्या बदल्यात जमीन देण्याचीही ग्रामस्थांची मागणी आहे. दुसरीकडे गावातील प्रत्येक कुटुंबाला दहा लाख रुपये पूनर्वसनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणार आहे. अद्याप त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू झालेली नाही.
१०५ कुटुंब संख्या
बुलडाणा, खामगाव, चिखली आणि मोताळा या चार तालुक्यांच्या सीमावर्ती भागात ज्ञानगंगा अभयारण्य आहे. त्याच्या मध्यभागी देव्हारी हे गाव वसलेले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासाच्या दृष्टीने हा भाग संवेदनशील आहे. परिणामस्वरुप या गावाचे पूनर्वसन प्राधान्याने करणे गरजेचे झाले होते. त्यासंदर्भातील प्रक्रिया गेल्या काही दिवसापासून रखडलेली होती. देव्हारी गावात मतदार यादीनुसार १०५ कुटुंब असून त्यांच्याकडे जवळपास एक हजार गुरे आहेत. सोबतच अभयारण्यातील ३५० एक्कर जमीन ते कसत आहे.
अस्वलांसाठी ज्ञानगंगा प्रसिद्ध
बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य हे अस्वलांसाठी प्रसिद्ध आहे. यासोबतच बिबट, फुलपाखरांच्या विविध प्रजाती आणि येथील जैवविविधतेची साखळीही चांगली आहे. त्यामुळे अभयारण्याची ही नजाकत जपण्याच्या दृष्टीने या अभयारण्यातील मानवी हस्तक्षेप थांबवणे गरजेचे आहे. त्या दृष्टीकोणातून देव्हारी गावाच्या पूनर्वसनाचा प्रस्ताव असून आता ग्रामस्थही त्याबाबत सकारात्मक झाले आहे.
ज्ञानगंगा अभयारण्यातील देव्हारी या वनग्रामाच्या पूनर्वसनाची प्रक्रिया त्यांचा ठराव प्राप्त झाल्यानंतर सुरू होणार आहे. सात जुलै राजी यासंदर्भात गावात ग्रामसभा घेण्यात आली.
- सुरेश बगळे, तहसिलदार, बुलडाणा