देयक प्रकरणामुळे खळबळ!
By admin | Published: July 17, 2017 01:56 AM2017-07-17T01:56:33+5:302017-07-17T01:56:33+5:30
काम न करता काढले देयक : पावसाळी अधिवेशनात प्रकरण मांडण्याचा सानंदाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव: रस्ता डांबरीकरण न करता २० लक्ष रुपयांचे देयक सहा महिन्यांपूर्वीच काढल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात उघड झाली. दरम्यान, बिंग फुटू नये यासाठी पावसाळ्यात काम पूर्ण करण्यात आल्याचे ‘लोकमत’ने रविवारी उघडकीस आणले. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच प्रशासकीय विभागात एकच खळबळ उडाली आहे.
तर दुसरीकडे सदर गंभीर भ्रष्टाचाराचे प्रकरण विधान परिषद व विधानसभा विरोधी पक्षनेत्यांच्या माध्यमाने संबंधितांवर कारवाईसाठी पावसाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी जाहीर केले त्याचवेळी दोषींना सोडल्या जाणार नसल्याचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी सांगितले. खेर्डा ते टाकळीविरो हा तीन कि.मी.चा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत डांबरीकरणासाठी मंजूर झाला होता; मात्र स्थानिक अभियंता आणि कंत्राटदाराने मिळून हा रस्ताच गायब केला. डिसेंबर २०१६ पूर्वी या रस्त्याचे मोजमाप पुस्तिकेत काम झाल्याचे दाखवून ३१ डिसेंबर २०१६ रोजी २० लक्ष रुपयांचे देयक कंत्राटदाराला अदा करण्यात आले. या प्रकाराची माहिती एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला लागल्याने सदर भ्रष्टाचाराचे बिंग फुटले. याबाबतचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने रविवार १६ जुलैच्या अंकात प्रकाशित करताच एकच खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी खेर्डा हे गाव सर्वांगीण विकसित करण्यासाठी दत्तक घेतले व याच गावातील कामांमध्ये एवढ्या मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे. खामगाव सार्वजनिक बांधकाम विभागात या प्रकरणाशिवायही कामे गायब केल्याचे अनेक प्रकरणे असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे या विभागाची विशेष तपासणी होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. ‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या या भ्रष्टाचाराबाबतचे कौतुक होत आहे.
सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव
काम न करताच २० लक्ष रुपयांचे देयक अधिकारी व कंत्राटदारांनी संगनमत करून काढले व शासनाला लाखोंचा चुना लावण्याचा प्रयत्न केला. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच व्हॉट्स अॅप, फेसबुक, टिष्ट्वटर अशा सोशल मीडियावर ‘लोकमत’च्या धाडसाचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
‘लोकमत’ ने उघडकीस आणलेला खेर्डा येथील रस्त्याच्या कामाच्या भ्रष्टाचाराचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. असे प्रकार आपल्या मतदारसंघात आपण कदापिही सहन करणार नाही. सदर प्रकरणाची तत्काळ उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या सूचना आपण दिल्या असून, दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- आमदार अॅड. आकाश फुंडकर
खामगाव विधानसभा मतदारसंघ
आमदार फुंडकर यांनी दत्तक घेतलेल्या खेर्डा या गावाच्या रस्त्यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला. या भ्रष्टाचारामागे कोण-कोण आहे हेही उघडकीस येणे गरजेचे आहे. ‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या या भ्रष्टाचाराचे प्रकरण आपण विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व विखे पाटील यांच्या माध्यमातून येत्या पावसाळी अधिवेशनात मांडणार आहोत व या मागील भ्रष्टाचारी वृत्तींच्या नेतेमंडळींचा चेहरा जनतेसमोर आणणार आहोत.
- दिलीपकुमार सानंदा
माजी आमदार, खामगाव विधानसभा मतदारसंघ