पीककर्ज दर : जिल्हा तांत्रिक समितीचे आता जिल्हाधिकारी अध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:30 AM2021-03-14T04:30:43+5:302021-03-14T04:30:43+5:30
बुलडाणा : पीककर्जाचे दर निश्चित करण्यासाठी जिल्हास्तरावर महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जिल्हा तांत्रिक समितीचे अध्यक्ष म्हणून आता जिल्हाधिकारी हे काम ...
बुलडाणा : पीककर्जाचे दर निश्चित करण्यासाठी जिल्हास्तरावर महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जिल्हा तांत्रिक समितीचे अध्यक्ष म्हणून आता जिल्हाधिकारी हे काम पाहणार आहेत. यापूर्वी जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे व्यवस्थापक या समितीचे अध्यक्ष होते.
दरम्यान, राज्यस्तरावर जिल्हानिहाय पीककर्ज दरामध्ये समानता राहावी, या दृष्टीकोनातून काही महत्त्वपूर्ण बदलही ‘नाबार्ड’ने यासंदर्भात मध्यंतरी एका परिपत्रकाद्वारे केले होते. मात्र, जिल्हा तांत्रिक समितीमधील सदस्य हे पूर्वीप्रमाणेच राहणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले. केवळ जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हास्तरीय तांत्रिक समितीचे अध्यक्षपद गेले आहे. यावर्षीपासून ही जिल्हास्तरीय तांत्रिक समिती तज्ज्ञांशी चर्चा करून राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे हेक्टरी पीककर्जाचे दर निश्चित करून पाठवणार आहे. त्यानंतर राज्यस्तरीय समिती राज्यस्तरावर जिल्हानिहाय आढावा घेऊन यामध्ये काही बदल सुचवत ते जिल्हास्तरावर पाठवणार आहे. त्यानंतर जिल्हास्तरावर त्या अनुषंगाने शेककऱ्यांना हेक्टरी निश्चित करण्यात आलेल्या दरानुसार पीककर्ज वाटप करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या तांत्रिक समितीची गेल्या महिन्यात बैठक झाली असून, जिल्हास्तरावरील दर हे राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे पाठविण्यात आले आहेत. मार्चअखेर राज्यस्तरीय समिती त्या अनुषंगाने अवलोकन करून बुलडाणा जिल्ह्यासाठीचे पीककर्जाचे दर निश्चित करून जिल्हास्तरावर पाठवेल, असे सुत्रांनी सांगितले.