निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांना ६८ हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:33 AM2021-05-24T04:33:42+5:302021-05-24T04:33:42+5:30
निर्बंधांना बगल देत कापड दुकान उघडून ग्राहकांची गर्दी जमविणाऱ्या अमर कलेक्शन कापड दुकान चालकांना पालिकेने ३५ हजार रुपयांचा दंड ...
निर्बंधांना बगल देत कापड दुकान उघडून ग्राहकांची गर्दी जमविणाऱ्या अमर कलेक्शन कापड दुकान चालकांना पालिकेने ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. यासोबतच आर. आर. ट्रॅव्हल्सलाही जवळपास आठ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याव्यतिरिक्त निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या छोटे व्यावसायिक व पादचाऱ्यांनाही पालिका व पोलीस प्रशासनाने दंड ठोठावला आहे. दिवसभरात प्रशासनाने ६८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे शहरातील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात वाढत्या कोरोना सांसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केलेले आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तू तथा दूध विक्री व शेती उपयोगी दुकानांना मर्यादित वेळेत उघडे ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र, प्रशासनाच्या आदेशाला बगल देत काही व्यावसायिक त्यांची प्रतिष्ठाने उघडी ठेवत आहेत. अशा दुकानांवर पालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. यासाठी पालिकेने पथकच नियुक्त केले आहे. दरम्यान हे पथक फिरतीवर असताना आठवडी बाजारात एक कापड दुकान उघडे असल्याचे दिसले. तेथे ग्राहकांचीही गर्दी होती. त्यामुळे पालिकेचे पथक तिथे धडकले. यावेळी दुकानामध्ये जवळपास ३५ ग्राहक आढळून आले. त्यामुळे पालिकेच्या पथकाने दुकान चालकाकडून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई पालिकेने केली आहे. दरम्यान शहरात अन्य काही व्यावसायिकांनाही पालिकेने दंड ठोठावला आहे.