बुलडाणा जि.प.च्या तीन कर्मचा-यांना दंड
By admin | Published: April 12, 2016 01:24 AM2016-04-12T01:24:56+5:302016-04-12T01:24:56+5:30
राज्य माहिती आयोगाचा दणका; माहिती न देणे भोवले.
चिखली (जि. बुलडाणा): माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती देण्यास दिरंगाई केल्याप्रकरणी राज्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाने बुलडाणा जिल्हा परिषदेचे तत्कालीन सहायक जन माहिती अधिकारी संदीप रिंढे व एस.आर. कासारे व जनमाहिती अधिकारी अहिरे यांना प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा निकाल २९ मार्च रोजी देण्यात आला असून, याबाबत आदेशाची प्रत ९ एप्रिल रोजी तक्रारकर्ता दत्ता खेडेकर यांना प्राप्त झाली.
चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील दत्ता विजय खेडेकर यांनी बुलडाणा जिल्हा परिषदेकडे जि.प. मराठी शाळामधील सहायक शिक्षकांची रिक्त पदे व अतिरिक्त शिक्षकांची माहिती २ मे २0१३ रोजी माहितीच्या अधिकारातून मागितली होती; मात्र सदर माहिती अर्जदारास मिळाली नाही. यानंतर अर्जदाराने प्रथम अपिली अधिकारी तथा शिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज केले. तेथेही माहिती न मिळाल्यामुळे पुढे जनमाहिती अधिकारी तथा अधीक्षक प्राथ. शिक्षण विभाग यांच्याकडे अर्ज केला असता, त्यांच्याकडून माहिती मिळाली नाही. यामुळे अर्जदार दत्ता खेडेकर यांनी राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे अपील केल होते.