पाच दिवस सुरू होते नुसते ठो...ठो...ठो...; पोलिस दलाच्या वार्षिक गोळीबार सरावात कर्मचाऱ्यांनी साधला अचूक निशाणा
By भगवान वानखेडे | Published: March 21, 2023 05:50 PM2023-03-21T17:50:30+5:302023-03-21T17:50:48+5:30
जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली येथील चांदमारी परिसरातील गोळीबार मैदानावर जिल्हा पोलिस दलाचा गोळीबार सराव १६ ते २१ मार्चदरम्यान सुरू होता.
बुलढाणा : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना शस्त्रांची ओळख व्हावी, यासोबतच शस्त्र चालविण्याचा सराव व्हावा म्हणून वार्षिक गोळीबार सराव १६ ते २१ मार्चदरम्यान राबविण्यात आला. यामध्ये ११२ अधिकाऱ्यांसह १ हजार ८८ कर्मचाऱ्यांनी सराव केला. यामुळे येथील चांदमारी परिसरातील गोळीबार मैदानावर पाच दिवस नुसता ठो...ठो...ठो... असा आवाज घुमत होता.
जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली येथील चांदमारी परिसरातील गोळीबार मैदानावर जिल्हा पोलिस दलाचा गोळीबार सराव १६ ते २१ मार्चदरम्यान सुरू होता. यामध्ये जिल्हा पोलिस दलातील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शस्त्र हाताळणी आणि गोळीबाराची उजळणी व्हावी म्हणून वार्षिक गोळीबार सराव राबविण्यात आला. गोळीबार मैदानावर जिल्हा पोलिस दलातील कर्मचारी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत सराव करीत असल्याने मैदानावर नुसता फायरिंगचा आवाज घुमत होता. यामध्ये दररोज १५० ते २०० पोलिस कर्मचारी-अधिकारी सहभागी होत होते.
१ हजार ८८ कर्मचारी आणि ११२ अधिकाऱ्यांनी केला सराव
या गोळीबाराच्या सरावात पोलिस कर्मचारी, अधिकारी यांच्या गोळीबाराच्या सरावाची उजळणी करून घेण्यात आली. येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचे सामर्थ्य आणि धैर्य या सरावातून येत असल्याने दरवर्षी हा सराव केला जातो. या सरावामध्ये पाच दिवसांत ११२ अधिकारी आणि १ हजार ८८ कर्मचारी सहभागी झाले होते.
या शस्त्राद्वारे केला सराव
पोलिसांना पिस्टल, रिव्हाॅल्व्हर, कारबाइन, टेलबोर, एसएलआर, इन्सास आणि एके ४७ या अत्याधुनिक शस्त्राद्वारे गोळीबारचा सराव केला गेला. यातील प्रत्येक शस्त्राच्या प्रत्येकी १० राऊंड देण्यात आल्या होत्या.
लवकरच उजळणी पाठ्यक्रम
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार सरावानंतर आता पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्यांंसाठी पोलिस मुख्यालयात उजळणी पाठ्यक्रम सुरू केला जाणार आहे. या उजळणी पाठ्यक्रमांतून पोलिस कर्मचाऱ्यांकडून कायद्याची उजळणी करून घेतली जाणार आहे.
दैनंदिन कामकाजात शस्त्र हाताळणीचा विसर पडू नये म्हणून दरवर्षी गोळीबार सराव केला जातो. यंदाही अधिकारी कर्मचाऱ्यांनी हा सराव केला. यातून परिस्थिती हाताळण्याचे सामर्थ्य येते. कर्मचाऱ्यांसाठी लवकरच उजळणी पाठ्यक्रम राबविला जाणार आहे.
-सारंग आवाड, जिल्हा पोलिस अधीक्षक, बुलढाणा.