‘अतिक्रमण हटाव’ विरुद्ध याचिका दाखल
By admin | Published: May 3, 2015 02:06 AM2015-05-03T02:06:58+5:302015-05-03T02:06:58+5:30
एकता लघु व्यापारी कल्याणकारी असोसिएशनने केली नागपूर खंडपीठात याचिका दाखल.
बुलडाणा : शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरुद्ध एकता लघु व्यापारी कल्याणकारी असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेवर न्यायालय काय निर्णय देणार, याकडे अतिक्रमिकांसह न.प. प्रशासनाचेही लक्ष लागून आहे.
मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाकडे दाखल याचिका क्रमांक ५१/२0१४ च्या निकालपत्रात दिलेल्या निर्देशाचा चुकीचा अर्थ लावून बुलडाणा जिल्हा प्रशासन व न.प. प्रशासनाने १६ एप्रिलपासून बुलडाणा शहरातील अतिक्रमणो हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. ५ मे पासून पोलीस संरक्षणात या मोहिमेला गती देण्याची चर्चा शहरभरात सुरू असल्याने लघुव्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्हा एकता लघु व्यापारी कल्याणकारी असोसिएशनने ३0 एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिटपिटीशन क्र.२५५६/२0१५ अन्वये विविध मुद्याद्वारे याचिकेत आव्हान दिले आहे. त्यामुळे अतिक्रमिकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन असोसिएशनचे पदाधिकारी अब्दुल रहिम शे.बिराम, राणुसिंग पुरोहित, शे.जुबेर शे.अमिर, माहाळणकर, कुणाल पैठणकर, रमेश तळणीकर, राजेंद्र उन्हाळे, प्रशांत गायकवाड, संजय विरवे यांनी केले. सदर याचिका अभय माणिकराव सोनुने, जितेंद्र रनाळकर यांनी केली आहे.