सातपुडा पर्वत रांगेतील सालईबनात रंगला मध्य प्रदेशातील आदिवासींचा ‘फगवा’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 02:26 PM2018-03-05T14:26:57+5:302018-03-05T14:45:53+5:30
खामगाव: आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी-वनवासी समुदायातील बांधवांचा फगवा उत्सव रविवारी सालईबनात रंगला.
खामगाव: आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी-वनवासी समुदायातील बांधवांचा फगवा उत्सव रविवारी सालईबनात रंगला. यामध्ये महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदविला. ढोल, ढोलकी आणि मांडलचा वापर करून १६ आदिवासी- वनवासी चमूंनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
महात्मा गांधी लोकसेवा संघ, सालईबन परिवार आणि तरुणाई फांऊडेशनच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जामोद तालुक्यातील सालईबन येथे रविवारी भव्य फगवा महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवात सातपुड्याच्या पर्वतरांगेतील महाराष्ट्राच्या सीमेवरील आदिवासी-वनवासी बांधवांसोबतच मध्यप्रदेशातील विविध आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधव आपल्या परिवारासह सहभागी झाले.
यात १६ आदिवासी-वनवासी चमूंचा सहभाग होता. महाराष्ट्रातील वडपाणी, बांडापिंपळ, चालठाणा, भिंगारा, गोमाल, चाळीस टापरी, गोरक्षनाथ, उमापूर, इस्लामपूर, चारबन, मेंढाचारी, कुंवरदेव, आमपाणी, सोनबर्डी, वसाडी, हड्यामाल, अंबाबरवा या गावातील आदिवासी चमू सोबतच मध्यप्रदेशातील बादलखोरा, चिल्लारा, आमलापाणी, करोली, जैसोंकी येथील चमू ढोल, ढोलकी आणि ‘माडंल’ घेवून फगवा महोत्सवात सहभागी झाले. या महोत्सवात जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी उद्घाटनाच्या सत्रात, तर बुलडाणा मतदार संघाचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी समारोपीय सत्राला हजेरी लावली. सुनगावच्या सरपंच विजयाताई पाटील, ग्रामसेवक टी.जी. चौधरी, उपायुक्त शिवाजी पाचारणे (जीएसटी), अमरावती विद्यापीठाचे अमरावती विभागाचे रासेयोचे समन्वयक प्रा. राजेश मिरगे, महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष शिवचरण ठाकूर, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता पाटील, अजिंक्य फिटनेस सेंटरचे धनंजय भगत, डॉ. सदानंद भुसारी, नाज्यासिंग बोंडळ, तरुणाईचे अध्यक्ष नारायण पिठोरे, मनजीतसिंग सिख यांची यावेळी उपस्थिती होती.
दोन आमदारांचा सहभाग!
आदिवासींच्या फगवा उत्सवात दोन आमदारांनी उपस्थिती दर्शविली. यामध्ये जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार संजय कुटे यांनी फगवा महोत्सवाचे उद्घाटन केले तर, समारोप बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. यावेळी आदिवासी बांधवांनी आमदारद्वयांसोबतच स्थानिक लोकप्रतिनिधींचे आपल्या पारंपारिक पध्दतीने स्वागत केले.