पीएचडीधारक विद्यार्थी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:30 AM2021-04-03T04:30:47+5:302021-04-03T04:30:47+5:30
महाराष्ट्र शासनातर्फे इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन ...
महाराष्ट्र शासनातर्फे इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची ९ ऑगस्ट २०१९ रोजी सारथी व बार्टी या संस्थांच्या धर्तीवर स्थापना करण्यात आली. महाज्योती संस्थेमार्फत विविध बाबींसाठी अधिकृत जाहिरात काढून विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी निधी किंवा अधिछात्रवृत्ती मंजूर केली जाते. महाज्योती स्थापनेनंतर घोषणांचा पाऊस झाला, परंतु अंमलबजावणी फार कमी प्रमाणात झाली. महाज्योती तर्फ़े संशोधक (पीएच.डी) विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर अधिकृत जाहिरात काढण्यासंबंधी घोषणा स्वतः ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ८ जानेवारी २०२१ रोजी केली होती. परंतु जवळपास तीन महिन्याचा कालावधी उलटून गेला, तरी संशोधक (पीएच.डी) साठीची अधिकृत जाहिरात न आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसत आहे. यासंबंधी संशोधक (पीएच.डी) विद्यार्थी गेले दोन वर्ष या अधिछात्रवृत्तीसाठी पाठपुरावा करत आहे. महाज्योती कार्यालयात अनेकवेळा निवेदन देऊन अथवा वारंवार संबंधित मंत्री व इतर अधिकारी यांना भेटून जाहिरात काढण्याबाबत चर्चा केलेली आहे. परंतु या विद्यार्थ्यांना केवळ खोटी आश्वासनेच मिळाली. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले असून आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. विद्यार्थी पीएचडीसाठी अधिकृत जाहिरात तत्काळ करण्यात यावी किंवा शासनाने परिपत्रक काढून महाज्योती तर्फे इतर संस्थेप्रमाणे (सारथी व बार्टी) पीएचडीच्या विद्यार्थ्यांना ळणार नाही, महाज्योती या संस्थेसाठी संपूर्ण वेळ अध्यक्षांची नेमणूक करावी, यासह विविध मागण्या महाराष्ट्रातील संशोधक विद्यार्थी करत आहे. विद्यार्थ्यांच्या या मागण्यांसाठी देऊळगाव राजा येथील विविध विद्यार्थी संघटना, संशोधक विद्यार्थी संघटनांनी निवेदन दिले आहे.