वनविभागाच्या कायद्यात अडकला पिंपळडोह किल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 06:50 PM2021-08-05T18:50:33+5:302021-08-05T18:50:59+5:30
Pimpaldoh fort stuck in forest department law : पर्यटक व अभ्यासकांना किल्ल्यावर जाण्याकरिता अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Next
- िवेक चांदूरकरखामगाव : अंबाबरवा अभयारण्यात वसाली गावाजवळ डोंगरावर पिंपळडोह किल्ला आहे. या किल्ल्यावर जाण्यास वनविभागाने बंदी घातली असून, वरिष्ठ स्तरावरून परवागनी घ्यावी लागते. त्यामुळे पर्यटक व अभ्यासकांना किल्ल्यावर जाण्याकरिता अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बुलडाणा जिल्ह्यात मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या घनदाट अंबाबरवा अभयारण्यात वसाली या गावापासून चार ते पाच किमी अंतरावर पिंपळडोह किल्ल्याचे अवशेष बघायला मिळतात़ आता बरीच पडझड झाली आहे़ येथे केवळ अवशेषच शिल्लक असून, हे अवशेष समृद्घ अशा इतिहासाची साक्ष देतात़ या अवशेषांवरून येथे कधी हजारो लोकांचा राबता असावा, राज्य असावे, राज्यकर्ते असावे व प्रजाही नांदत असावी हे निदर्शनास येते़ पूरातन वास्तूंबाबत असलेल्या शासनाच्या उदासिन धोरणामुळे या किल्ल्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे़ या किल्ल्याबद्दल फारसी माहिती नसून, इतिहास दडलेला आहे़ या ठिकाणी पिंपळाचे झाडे आहेत तसेच डोह असल्यामुळे या किल्ल्याला पिंपळडोह म्हणतात. हा किल्ला मध्यप्रदेशातील सत्ताधीशांच्या ताब्यात असल्यामुळे याचा फारसा इतिहास पुढे आला नाही. येथील राजा सिताब खॉ याने सुरूवातीला पिंपळडोह येथे वास्तव्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी पाण्याची सोय नव्हती तसेच अन्य अडचणींमुळे अखेर ते भिंगारा येथे वास्तव्यास आले व महाल बांधला, असा उल्लेखही काही पुस्तकांमध्ये आहे. बुलडाणा जिल्ह्यात मध्यप्रदेशच्या सीमेवर घनदाट असे अंबाबरवा अभयारण्य आहे़ वाघ, बिबट, अस्वल या हिंस्त्र पशूंसह अनेक प्राणी येथे वास करतात़ या अभयारण्यात डोंगराच्या पायथ्याशी वसाली हे गाव वसले आहे़ या गावापासून दोन किमी अंतरावर बंदरझिरा म्हणून एक ठिकाण आहे़ येथून तीन ते चार किमी अंतरावर डोंगरावर एक किल्ला आहे़ येथे वाहनांना जाण्यासाठी रस्ता नाही़ बंदरझिरापासून येथे पायीच जावे लागते़ किल्ल्याच्या रस्त्याने जातानाच आपल्याला दगडी खांब, हत्ती, सिंहाची शिल्प असलेले दगड पडलेले दिसतात़ एका दगडावर दोन पादुका कोरल्या असून, हा दगड रस्त्याच्या कडेला पडलेला आहे़ डोंगरावरील वरच्या भागात किल्ल्याचे प्रवेशव्दार आहे़ प्रवेशव्दाराचे बांधकाम दगड आणि विटांनी केलेले आहे़ या प्रवेशव्दारात सैनिक राहत होते़ तशाप्रकारे तेथे चौक्याही आहेत़ प्रवेशव्दारातून आतमध्ये गेल्यावर दोन तळे आहेत़ पावसाळयात यामध्ये पाणी असते, उन्हाळयात तळे सुकतात़ या तळयांचे बांधकामही दगडांनी केले आहे़ किल्ल्यातील रहिवाशांसाठी ही तळे बांधण्यात आली असावी़ आतमध्ये ठिकठिकाणी पडलेल्या खोल्यांचे अवशेष दिसतात़ मागच्या बाजुने परकोट आहे, तो ही आता ढासळत आहे़या किल्ल्याचे बांधकाम नेमके केव्हा झाले याबाबत माहिती नाही़ ऐतिहासिक वास्तू या नवतरूणांसाठी प्रेरणादायी असतात. जो देश इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही, असे म्हणतात़ त्यामुळे किल्ल्यांचे जतन होणे गरजेचे आहे़ वसालीचा किल्ला एक पर्यटन स्थळ म्हणून उदयास येवू शकतो, ट्रेकिंग करणाºयांसाठी हा उत्तम किल्ला आहे़ याकडे लक्ष देण्याची गरज आहे़