पिंपळगाव देवी प्रा.आ. केंद्रासाठी अडीच कोटी!
By admin | Published: March 28, 2016 02:07 AM2016-03-28T02:07:16+5:302016-03-28T02:07:16+5:30
हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रयत्नांना यश.
बुलडाणा : मोताळा तालुक्यातील आरोग्य सुविधेचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रयत्नातून पिंपळगावदेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन मुख्य इमारतीसाठी २.५0 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यापैकी ५0 लक्ष तरतूद तातडीने उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मोताळा तालुक्यात आरोग्य विषयक सुविधांचा मोठय़ा प्रमाणावर अनुशेष आहे. सदर अनुशेष लक्षात घेता, गेल्या वर्षभरात आ. सपकाळ यांनी ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आरोग्य सुविधांचा प्रश्न शासनदरबारी सातत्याने लावून धरलेला आहे. त्यामध्ये भौतिक सुविधा बरोबरच रिक्त पदे व अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पिंपळगावदेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन मुख्य इमारतीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता. त्या अनुषंगाने इमारत बांधकामासाठी सुमारे २.५0 कोटी रुपयांची मान्यता प्रदान करण्यात आली असून, सन २0१५-१६ या वित्तीय वर्षामध्ये त्यासाठी रुपए ५0 लाख शासनाकडून १४ मार्च २0१६ च्या आदेशान्वये जिल्हा परिषदेस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा फायदा परिसरातील जनतेला होणार आहे.
दरम्यान, या सोबतच रोहिणखेड व कोथळी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याबाबतचा प्रस्तावसुद्धा शासनदरबारी सादर करण्यात आलेला असून, विदर्भातील ग्रामीण भागातील दोन हजार खाटांचा आरोग्यविषयक अनुशेष लक्षात घेता या प्रस्तावास मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आ. सपकाळ यांनी सांगितले.