पिंपळगाव राजा पोलिसांची 'खाबुगिरी' सोशल मिडीयावर व्हायरल: कारवाई टाळण्यासाठी अर्थपूर्ण व्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 01:46 PM2018-12-02T13:46:15+5:302018-12-02T13:48:40+5:30
खामगाव: पिंपळगाव राजा पोलिसांनी पैसे स्वीकारल्याचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने, खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: पिंपळगाव राजा पोलिसांनी पैसे स्वीकारल्याचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने, खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. कारवाई टाळण्यासाठी पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनचा बीट जमादार पैसे स्वीकारत असल्याचे दोन व्हीडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडीओ १ डिसेंबर रोजीचा आहे. तडकाफडकी कारवाई करीत या बीट जमादारचा प्रभार काढून घेण्यात आला असला तरी, पोलिस प्रशासनाच्या खाबुगिरीचे धिंडवडे या प्रकारामुळे निघत आहेत.
खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनतंर्गत येत असलेल्या भंडारी येथे एकाच दोन गटात वाद उद्भवला होता. परस्पर विरोधी तक्रारींवरून दोन्ही गटांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये पहिल्यांदा तक्रार दाखल न करण्यासाठी तर दुसऱ्यांदा दाखल तक्रारींवर अटकेची कारवाई टाळण्यासाठी पोलिस स्टेशनचे बीट जमादार निवृत्ती एकनाथ बाठे यांनी एका गटाला पैशांची मागणी केली. २५ हजार रुपये घेवूनही तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर अटकेची कारवाई टाळण्यासाठी देखील पैशांची मागणी करण्यात आली. मागणीनुसार पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनच्या पाठीमागील एका खोलीत पैसे स्वीकारण्यात देखील आले. या खोलीत पैसे स्वीकारताना आणि पैसे स्वीकारल्यानंतर दिलासा देतानाही बीटजमादार व्हीडीओत दिसून येत आहे. पैसे स्वीकारतानाचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने पोलिस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
बीट जमादारचा प्रभार काढला!
पोलिस स्टेशनच्या आवारात नव्हे तर, पोलिस स्टेशनमधील एका खोलीत बीट जमादार पैसे स्वीकारत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. हा प्रकार आपल्या अंगावर शेकू नये, यासाठी पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार निखिल फटींग यांनी संबंधीत बीट जमादारचा प्रभार तडकाफडकी काढून घेतला आहे. शनिवारी रात्री उशिरा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रविवारी ही कारवाई करण्यात आली.
पिंपळगाव राजा पोलिस स्टेशन वादग्रस्त!
खामगाव तालुक्यात संवेदनशील पोलिस स्टेशन म्हणून पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनची पोलिस दप्तरी नोंद आहे. वादग्रस्त असलेल्या पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनचा कारभार गेल्या काही दिवसांत कमालिचा ढेपाळला आहे. अवैध धंद्यांना याठिकाणी उधान आले असतानाच, रेशन धान्याचे पकडलेले वाहन सोडण्याचाही प्रकार येथे सप्टेंबर महिन्यात घडला होता. इतकेच नव्हेतर आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येथील पोलिसांना मिळालेला 'प्रसाद' चर्चेचा विषय ठरला होता.
राजकीय पदाधिकाऱ्याची 'चमचेगिरी'!
पोलिसांच्या खाबुगिरीचा सोशल मिडीयावर व्हायरल प्रकार दाबण्यासाठी पिंपळगाव राजा सर्कल मधील एका स्थानिक पदाधिकाºयांची 'चमचेगिरी'ही या निमित्ताने चर्चेत आली आहे. हा प्रकार आहे तेथेच थांबविण्यासाठी शनिवारपासून एक राजकीय पुढारी कमालिचा सक्रीय झाला आहे. या पुढाºयापासून संबंधितांना विनंती वजा धमक्याही दिल्या जात असल्याची चर्चा परिसरात आहे.
बीट जमादारच्या तोंडी साहेबांचा उल्लेख!
व्हायरल झालेल्या व्हीडीओमध्ये पैसे स्वीकारताना बीट जमादार निवृत्ती बाठे वारंवार साहेबांचा उल्लेख करीत आहे. त्यामुळे पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनचे ठाणेदारही खाबुगिरी प्रकरणात गुंतल्याची चर्चा होत आहे. हाच बीट जमादार एका सोशल मिडीया आणि रेशन वाहन प्रकरणी वसुली केल्याच्या चर्चेत आला होता. हे येथे उल्लेखनिय
सोशल मिडीयावर व्हायरल व्हीडीओ आपण शनिवारी रात्रीच बघितला आहे. व्हिडीओ बघितल्यानंतर बीट जमादार बाठे यांचा प्रभार काढण्याचे आदेश केलेत. या प्रकाराबाबत बीट जमादार बाठेच अधिक सांगू शकतील. त्यांच्या तोंडी ह्यसाहेबह्ण हा उल्लेख असला तरी, या विषयाशी संबंधीत असेल असे गरजेचे नाही.
- निखिल फटींग,पोलिस निरिक्षक, पिंपळगाव राजा, पोलिस स्टेशन.