वर्षभरापासून पाइपलाइन बंद!

By admin | Published: August 14, 2015 11:43 PM2015-08-14T23:43:22+5:302015-08-14T23:43:22+5:30

साखरखेर्डा येथील जीवन प्राधिकरण योजनेतील पाइपलाइन निकृष्ट.

Pipeline shut off from year to year! | वर्षभरापासून पाइपलाइन बंद!

वर्षभरापासून पाइपलाइन बंद!

Next

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): तालुक्यातील साखरखेर्डा येथे जीवन प्राधिकरण योजनेतील पाइपलाइन निकृष्ट असल्याने येथील पाण्याची टाकी शोभेची वास्तू बनली आहे. जीवन प्राधिकरण योजनेंतर्गतची पाइपलाइन वारंवार फुटत असल्याने वर्षभरापासून ही पाइपलाइन बंदच आहे. परिणामी, साखरखेर्डा येथे पाणीटंचाईची समस्या कायम राहत आहे. साखरखेर्डा गावाची लोकसंख्या १८ हजार असून, गावाची कायमस्वरुपी पाणी समस्या सोडविण्यासाठी १९९८ साली युती सरकारने ३.५0 कोटीची ग्रामीण जीवन प्राधिकरण योजना मंजूर केली होती. १0 टक्के निधी ग्रामपंचायतीने भरल्यानंतर या योजनेचे काम सुरु झाले. सुमारे ४ वर्षे योजनेवर निधी न मिळाल्याने काम रखडत गेले. एकदाचा निधी प्राप्त झाला तोपर्यंत योजनेची किंमतही वाढत गेली. लोखंडी पाइपऐवजी पी.व्ही.सी. पाईप टाकून योजना पूर्ण करण्यात आली. सरळ रोडने पाइप न टाकता शेतकर्‍यांच्या शेतातून पाइप टाकल्याने पाइप फुटल्यानंतर शेतातील पिकांचे नुकसान होतेच. त्याचबरोबर दुरुस्तीला अडचण निर्माण होते. पाइपलाइन फुटल्यानंतर जोडणीसाठी लागणारे पाइप जळगाव खांदेशशिवाय मिळत नाहीत. १00 फूट लांब नाली खोदून जोडणी करावी लागते, हाही खर्च ग्रामपंचायतीला करावा लागतो. या सर्व अडचणीतून पाणीपुरवठा करणे ग्रामपंचायतीला अशक्य झाले आहे. वीज बिल, अंतर्गत दुरुस्ती आदी कामांसाठी लाखो रुपयांचे कर्ज ग्रामपंचायतीवर झाले आहे. हा सर्व भार कमी करायचा असेल तर ग्रामीण पाणीपुरवठा किंवा जीवन प्राधिकरण योजनेतून पाइपलाइन (लोखंडी) टाकण्यात यावी, यासाठी आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी ग्रा.पं.सदस्य महेंद्र पाटील, असलम अंजूम, शे.रफिक शे.शफी, आयुब कुरेशी, जमनाप्रसाद तिवारी, भागवत मंडळकर, दर्शनकुमार गवई, सुनील गवई, संदीप खिल्लारे, भिकाजी काळे, गणेशसिंग राजपूत यांच्यासह युसूफसेठ कुरेशी, बबनसेठ अग्रवाल, चंद्रशेखर शुक्ल, सुजित महाजन, राजू राजपूत, चरणसिंग ठाकूर यांनी केली आहे.

Web Title: Pipeline shut off from year to year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.