नदीपात्रातील शेतरस्त्यात खोदले खड्डे; शेतकरी झाले त्रस्त
By विवेक चांदुरकर | Published: March 22, 2024 06:36 PM2024-03-22T18:36:13+5:302024-03-22T18:36:30+5:30
नदीपात्रातून जात असलेल्या रस्त्यावर खड्डे करून रेतीचे उत्खनन करण्यात येत आहे
बावनबीर : संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर मंडळांतर्गत अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्यांनी नदीपात्रात असलेल्या शेतरस्त्यांमध्येच खड्डे खोदले आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. तसेच अवैध रेतीची वाहतूक करणारी वाहने शेतातून जात असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे.
बावनबीर मंडळातील भाऊ मंदिर शिवारातील केदार नदी, पंचाळा शिवारातील लेंडी नदी, पडसोडा शिवारातील कचेरी नदी तसेच शेत शिवारातून वाहणाऱ्या नाल्यांमधून मोठ्या प्रमाणावर रेती चोरी केली जात आहे. शासनाचे लाखो रुपयांचे गौण खनिजाची चोरी करण्यात येत आहे. गौण खनिजाची वाहतूक करणारे टिप्पर व ट्रक शेतातील रस्त्यांतून जातात. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. तसेच रस्त्यांचीही दुरवस्था होत आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्याकरिता असलेला रस्त्यात मोठमोठे खड्डे करण्यात आले आहेत.
नदीपात्रातून जात असलेल्या रस्त्यावर खड्डे करून रेतीचे उत्खनन करण्यात येत आहे. याबाबत संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी यांना माहिती असूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंचाळा शिवारातील लेंडी नदी, बावनबीर शिवारातील केदार नदी व परसोळा शिवारातील कचेरी नदीची प्रत्यक्ष पाहणी करून चोरी गेलेल्या गौण खनिज चोरीची पाहणी करून दोषींवर कारवाइ करण्याची मागणी होत आहे. तसेच शेतकऱ्यांचे शेतमार्ग तत्काळ दुरुस्त करून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
बावनबीर मंडळांतर्गत मोठ्या प्रमाणावर गौण खनिज चोरी जात आहे. चोरटे शेत रस्त्याचे नुकसान करीत आहे. याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारवाई करावी.- शेख मोहसीन, शेतकरी बावनबीर