झाडे लावा व झाडे जगवाचा संदेश देत सोडले वृक्षप्रेमीने प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:33 AM2021-05-17T04:33:11+5:302021-05-17T04:33:11+5:30
वृक्षारोपणासाठी शासन दरवर्षी करोडो रुपये खर्च करते, पण त्यांचे संगोपन कोणीच करीत नाही; परंतु समाजात असे बरेच लोक आहेत ...
वृक्षारोपणासाठी शासन दरवर्षी करोडो रुपये खर्च करते, पण त्यांचे संगोपन कोणीच करीत नाही; परंतु समाजात असे बरेच लोक आहेत की ते आपले काम निःस्वार्थपणे करतात. यात त्यांना जाहिरातीची वा कोणत्याही फळाची अपेक्षा नसते, असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजेच मोताळा तालुक्यातील पोफळी येथील कैलासराव भिकनराव देशमुख (वय ७२) होय. घरी ४०-४५ एकर शेती असून मोठा मुलगा पुणे येथील एका कंपनीत, तर लहान मुलगा गावातील विद्यालयात शिक्षकाची नोकरी करतात. झाडांवर प्रेम असल्यामुळे त्यांनी आपल्या शेतात व गावात निरनिराळ्या प्रकारची झाडे लावून ती जगवली. ६ महिन्यांपूर्वी गावालगत बांधलेल्या नवीन स्मशानभूमी परिसरातही त्यांनी बरीच झाडे लावली होती. सध्या त्या झाडांचे संगोपन सुरू होते, पण मागील १५ दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. कालांतराने ते बोलूही शकत नव्हते. बहुधा त्यांना त्यांच्या मृत्यूची चाहूल लागली असावी. म्हणूनच त्यांनी एका कागदावर लिहून सर्व गावकऱ्यांनी दिलेल्या प्रेमाचे आभार मानले. आता माझे आयुष्य संपले आहे, असे दुसऱ्या कागदावर लिहून त्यांनी गावात काही ठिकाणी नुकत्याच लावलेल्या झाडांचे योग्य संगोपन करा व शक्य होईल तेवढे झाडे लावा व इतरांनाही सांगा, असे लिहीत भावनिक आवाहन केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ९ मे २०२१ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.