चिमुकल्यांचे ‘सीड बॉल’च्या माध्यमातून वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 02:53 PM2019-07-07T14:53:15+5:302019-07-07T14:53:24+5:30
ईरा किड्स स्कूलच्या चिमुकल्यांनी ‘सीड बॉल’ तयार केले असून या चिमुकल्यांनी तयार केलेल्या सीड्स बॉलचा वापर वृक्षारोपणासाठी करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : शासनाच्यावतीने ३३ कोटी वृक्षलागवड योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शासकीय, निमशासकीय कार्यालय, सामाजिक कार्यकर्ते संस्था, संघटनांच्या माध्यमातून खुल्या जागांवर, डोंगरांवर, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली जात आहे. यामध्ये आपलाही खारीचा वाटा राहावा, या हेतूने स्थानिक ईरा किड्स स्कूलच्या चिमुकल्यांनी ‘सीड बॉल’ तयार केले असून या चिमुकल्यांनी तयार केलेल्या सीड्स बॉलचा वापर वृक्षारोपणासाठी करण्यात येत आहे.
यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याच्या दृष्टिकोनातून येथील डॉ. युवराज व डॉ. सायली सिरसाट या डॉक्टर दाम्पत्याच्या संकल्पनेतून ‘सीड्स बॉल’ ही संकल्पना पुढे येत आहे. या सीड्स बॉलची उपयोगीता पाहता स्थानिक ईरा किडस् स्कूलच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. हे सीड बॉल बनविणे सोपे असल्याने यात शाळेतील चिमुकल्यानी उत्साहात सहभाग नोंदविला. मानवाच्या विकासाच्या हव्यासापोटी प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत असून यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळून विविध प्राकृतिक आपदांना तोंड द्यावे लागत आहे. यावर वृक्षलागवड करणे हाच एकमेव पर्याय शिल्लक असल्याने ईरा किड्स या शाळेतील विद्यार्थ्यांनी सिड बॉल ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवून चारशेहून अधिक सिड बॉल तयार केले होते. यासाठी शेणखत व काळ्या मातीचे मिश्रण करून यांचे लहान गोळे तयार करून या मातीच्या गोळ्यात विविध वृक्षाच्या बिया भरून हे गोळे व्यविस्थतरित्या सुकविल्यानंतर तालुक्यातील माळशेंबा-भडगांव रस्त्यावर व परिसरातील मोकळ्या वनजमीनीवर चिमुकल्या हातांनी टकाले आहेत. यामाध्यमातून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी झाडे लावा, झाडे जगवाचा कृतीशील संदेश दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)