रोजगार हमी योजनेतून केली १२०० वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:32 AM2021-08-01T04:32:10+5:302021-08-01T04:32:10+5:30
साखरखेर्डा : रोजगार हमी योजनेअंतर्गत वन विभागाने साखरखेर्डा ते शेंदुर्जन, तांदूळवाडी फाटा ते गोरेगाव यासह परिसरात हजारो वृक्ष लागवड ...
साखरखेर्डा :
रोजगार हमी योजनेअंतर्गत वन विभागाने साखरखेर्डा ते शेंदुर्जन, तांदूळवाडी फाटा ते गोरेगाव यासह परिसरात हजारो वृक्ष लागवड करून ते जगविले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वनराई नटली आहे.
गत अनेक वर्षांपासून सार्वजनिक वनीकरण विभागात वन कामगार म्हणून मधुकर खंडारे काम करीत आहेत. सेवा निवृत्तीनंतर ही त्यांच्या कामाची दखल घेऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवड कार्यक्रम रोजंदारीवर त्यांच्याकडे सोपविला. साखरखेर्डा ते शेंदुर्जन रोडलगत वृक्षलागवड करून शासनाने दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता त्यांनी केली. त्यामुळे नऊ किलोमीटर अंतरावर शेकडो वृक्ष डोलत आहेत. तीच मोहीम साखरखेर्डा ते सवडद, साखरखेर्डा ते वरोडी, साखरखेर्डा ते शिंदी या रस्त्यावर लागवड करून वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. डिसेंबर २० पासून तांदूळवाडी फाटा ते गोरेगाव या एक किलोमीटर अंतरावर त्यांनी १२०० वृक्षांची लागवड केली आहे. आज ही सर्व वृक्ष डोलाने उभी असून पाच महिला कामगार त्या वृक्षांचे संवर्धन करीत आहेत. उन्हाळ्यात डोक्यावर हंडा घेऊन पाणी घालून वृक्ष जगविली आहेत. ही वृक्ष लागवडीची मोहीम राबवत असताना गुराढोरांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याच बरोबर शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करणे हेही तितकेच महत्त्वाचे ठरत आहे. काही शेतकरी वृक्षलागवड करू देत नाही. त्यांना वृक्षलागवडीचे फायदे समजावून सांगावे लागतात. ही सर्व मोहीम वनरक्षकाला करावी लागते. आज उजाड झालेल्या रस्त्यांवर वृक्ष डोलू लागल्याने रस्ते वनराईने नटले आहेत़
बाेगस वृक्षलागवडप्रकरणी एक कर्मचारी निलंबित
शासन लाखो रुपये खर्च करून वृक्षलागवड कार्यक्रम राबवत आहे. काही भागात तर कर्मचारीच कागदावर वृक्षलागवड दाखवून लाखो रुपयांना चुना लावत आहेत. अशीच एक घटना मागील वर्षी तांदूळवाडी फाटा ते गोरेगाव रस्त्याच्या वृक्षलागवड प्रकरणात घडल्याने एका कर्मचाऱ्याला निलंबितही करण्यात आले आहे.
काेट
दिलेले वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे, असे समजून आम्ही काम करीत आलो.
मधुकर खंडारे वन कामगार, साखरखेर्डा