दुष्काळ ढिशक्याव...ढिशक्याव ; आदिवासी बांधवांनी केले एक लाख बियांचं रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 14:04 IST2019-06-05T14:01:38+5:302019-06-05T14:04:23+5:30
बांडापिंपळ हे गाव पाणीदार करण्यासाठी गावकऱ्यांनी ४५ अंश तापमानात भर दुपारी एक लाख बियांचं रोपण केले.

दुष्काळ ढिशक्याव...ढिशक्याव ; आदिवासी बांधवांनी केले एक लाख बियांचं रोपण
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: 'अन्न गुळगुळे;नाळ गुळगुळे ... दुष्काळ ढिशक्याव...ढिशक्याव... ढिशक्याव...!' असा नारा देत सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी बांधवांनी बुधवारी कृतीशील पर्यावरण दिन साजरा केला. बांडापिंपळ हे गाव पाणीदार करण्यासाठी गावकऱ्यांनी ४५ अंश तापमानात भर दुपारी एक लाख बियांचं रोपण केले.
पाणी फौंडेशनअंतर्गत बांडापिंपळ या आदिवासी गावाने 'सत्यमेव जयते' वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये ग्रामपंचायत सुनगाव, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र जळगाव, वनविभाग(प्रादेशिक-जळगाव), तरुणाई फौंडेशन, सालईबन परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सलग ५० दिवस श्रमदान करून मोठया प्रमाणात सलग समतल चर खोदण्यात आले. वनतळे, माती बंधारे, दगडी बांध आदी जलसंवर्धनाची कामे करण्यात आली. याच पाणलोट क्षेत्रात बुधवारी जागतिक पर्यावरण दिनी एक लाख बीजारोपनाचा कृतिशील उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात बांडा पिंपळ गावातील आबाल वृद्धांचा सकारात्मक सहभाग होता.
असे झाले बीज संकलन!
या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी शालेय विद्यार्थ्यांनी गत आठ दिवसापासून बीज संकलन केले. यामध्ये कडुलिंब, पळस, सीताफळ, अंजन, बिहाडा, बोर, आंबा, बहावा, करंज, सिसम, कडू बदाम, सालाई आदी स्थानिक प्रजातीच्या बियांचा समावेश होता. 'तरूणाई'च्या कार्यकर्त्यांनी खामगाव येथून बीज संकलन करीत या नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभाग नोंदविला.
वृक्षदिंडीने बीजारोपणाला सुरुवात!
बीजारोपण उपक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी बांडापिंपळ येथून वृक्षदिंडी काढण्यात आली. या वृक्षदिंडीला सरपंच विजया पाटील, जीएसटीचे सह आयुक्त टी. जी. पाचारणे(अमरावती), अशोक काळपांडे, ग्रामसेवक चौधरी, पुंडलिक पाटील, प.स. सदस्य महादेव धुर्डे, गजानन देशमुख, तरुणाईचे मनजीतसिह शीख, कृषी सहायक जी. पी. बंगाळे, एस. पी. माळी, एन. एस. शिंगणे, एस. एन. मेहेत्रे, प्रवीण गुजर, अमर गोमासे, चारुदत्त कांडेकर, बांडापिंपळ येथील जलयोध्ये, जलरागिनी आणि ग्रामस्थानी हिरवी झेंडी दिली.
पर्यावरण संवर्धनासाठी तरुणाईच्यावतीने वर्षभर विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमाचा भाग म्हणून बुधवारी एक लाखाच्या वर बीजारोपण करण्यात आले. यामध्ये अनेकांचा हातभार लागला.
-राजेंद्र कोल्हे
सचिव, तरुणाई फाऊंडेशन... खामगाव.