Plastic ban : प्लास्टिक व्यावसायिकांकडून 13 हजाराचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 01:49 PM2018-11-15T13:49:25+5:302018-11-15T13:50:36+5:30
Plastic ban : प्लास्टिक बंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी बुधवारी सायंकाळी टाकण्यात आलेल्या धाडीत प्लास्टिक व्यावसायिकांकडून १३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
खामगाव : प्लास्टिक बंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी बुधवारी सायंकाळी टाकण्यात आलेल्या धाडीत प्लास्टिक व्यावसायिकांकडून १३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अकोला येथील क्षेत्रीय अधिका-यांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. पर्यावरण रक्षणासाठी कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर राज्य शासनाने बंदी लादली आहे. मात्र, असे असतानाही खामगावच्या बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्याचा सहज वापर होत असल्याच्या गुप्त माहितीवरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी जितेंद्र गुप्ते बुधवारी सायंकाळी खामवात धडकले.
नगर पालिका आरोग्य अभियंता नीरज नाफडे, अतिक्रमण पथक प्रमुख मोहन अहीर यांच्यासह आरोग्य निरिक्षक आणि कर्मचा-यांसोबत त्यांनी बाजारपेठेत धाडी टाकल्या. यामध्ये बोधाराम लेखुमल, पंचरत्न ड्रेसेस, पंचशील बनियन सेंटर, शिव ट्रेडर्स, गुप्ता प्लास्टिक हाऊस, योगेश प्लास्टिक गांधी रोड, शंकर प्लास्टिक, आठवडी बाजार, सुमेरचंद गुणलाल यांच्यासह इतरांच्या व्यावसायिक प्रतिष्ठांतून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. उपरोक्त व्यावसायिकांकडून सुमारे १३ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. बुधवारी रात्री उशीरापर्यंत ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, कारवाईपूर्वीच धाडीची माहिती प्लास्टिक विक्रेत्यांपर्यंत पोहोचविणा-या आरोग्य विभागातील अधिका-याचा शोध, पालिका प्रशासनाकडून घेतल्या जात आहे.
या कारवाईची माहिती एका प्लास्टिक विक्रेत्याला आधीच पोहोचविण्यात आली होती. भारत प्लास्टिकवर धाड टाकण्यासाठी पालिकेचे पथक दोन वेळा पोहोचले होते. मात्र, दोन्ही वेळी हे व्यावसायिक प्रतिष्ठान बंद आढळून आले. हे येथे उल्लेखनिय!