खेळाडू हे राष्ट्राची संपत्ती आहेत : पालकमंत्री डॉ. शिंगणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:41 AM2021-09-04T04:41:20+5:302021-09-04T04:41:20+5:30
येथे महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने ९० व्या राज्यस्तरीय बॉक्सिंग पुरुष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी अन्न व ...
येथे महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने ९० व्या राज्यस्तरीय बॉक्सिंग पुरुष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या दृष्टिकोनातून खेळाडूंना नोकरीमध्ये ५ टक्के आरक्षण देण्याचे काम आपण क्रीडामंत्री असताना केले. ग्रामीण भागातील खेळाडूसुद्धा आपल्या खेळांच्या माध्यमातून देशाचे नाव उंचावत आहेत. ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. खेळाडूंनी देशाचा आणि स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी चांगले प्रदर्शन करावे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. खेळाडूंनी सांघिक भावना जोपासूनच आपल्या खेळाचे प्रदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
येथे आयोजित बॉक्सिंग स्पर्धेमध्ये राज्यभरातून २७१ खेळाडूंची नोंदणी झाली आहे. या स्पर्धेमधूनच महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात येणार आहे. बुलडाणा येथे झालेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.