प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयान योजनेचा लाभ घ्यावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:26 AM2021-06-06T04:26:17+5:302021-06-06T04:26:17+5:30
केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग अन्नयन योजना २०२०-२१ ही केंद्र पुरस्कृत योजना देशभरामध्ये राबविण्याचे ...
केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग अन्नयन योजना २०२०-२१ ही केंद्र पुरस्कृत योजना देशभरामध्ये राबविण्याचे नियोजन केले आहे. ही योजना असंघटीत व अनोंदणीकृत अन्न प्रक्रिया उद्योगाकरिता आहे. याचा कालावधी २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांचा असून, एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर राबविली जाणार आहे. या अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यासाठी पेरू फळ पिकासाठी मूल्य साखळी व सामूहिक सुविधा निर्मितीकरिता अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगाकरिता सामाईक पायाभूत सुविधा केंद्राकरिता ३५ टक्के अनुदान, ब्रँडिंग व मार्केटिंगसाठी एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदान, स्वयंसहाय्यता गटांना बीज भांडवल, लहान उपकरणे खरेदीसाठी ४० हजार प्रती सभासद (४ लाख) पर्यंत अनुदान देय आहे. योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट आणि सहकारी उत्पादक, शासन यंत्रणा किंवा खासगी उद्योग इत्यादी घटकांना लाभ देण्यासाठी सामायिक पायाभूत सुविधा या घटकांतर्गत नवीन प्रकल्पाचे प्रस्ताव ओडीओपी उत्पादनावर देता येतील. सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या प्रक्रिया प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी एक जिल्हा एक उत्पादनाच्या व्यतिरिक्त इतर प्रस्तावदेखील या योजनेमध्ये सादर करता येत असल्याने या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अतुल खारोळे व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक एम.एस.खान यांच्याशी संपर्क साधावा अथवा अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी केले आहे.