पेपरफुटीचे कनेक्शन शाेधताना पाेलिसांची दमछाक
By निलेश जोशी | Published: March 4, 2023 06:41 PM2023-03-04T18:41:25+5:302023-03-04T18:43:34+5:30
साखरखेर्डा पाेलिसांनी सुरू केला तपास
साखरखेर्डा : इयत्ता बारावीचा पेपर ३ मार्च राेजी समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याप्रकरणी सिंदखेडराजा पाेलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच हे प्रकरण साखरखेर्डा पाेलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. या पेपरफुटीचे कनेक्शन शाेधताना पाेलिसांची मात्र दमछाक हाेत असल्याचे चित्र आहे.
शिक्षण विभागाने दिलेल्या तक्रारीत साखरखेर्डापासून जवळच असलेल्या राजेगाव येथील केंद्राचा उल्लेख केला आहे. याच राजेगावात १ मार्च रोजी रसायनशास्त्राचा पेपर सुरू असताना एका विद्यार्थ्याला मोबाइलवरून उत्तर शोधून लिहीत असताना पकडण्यात आले हाेते. या विद्यार्थ्याला निलंबित करण्यात आले हाेते. त्यानंतर पेपर सुटल्यानंतर कारवाई करणाऱ्या बैठे पथकातील गटविकास अधिकारी यांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली हाेती. घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांना ताब्यात घेतले हाेते. त्यानंतर पुन्हा याच केंद्रावरून पेपर लीक झाल्याचा संशय व्यक्त हाेत आहे.
शाळा आडवळणी, मात्र पटसंख्या सर्वाधिक
राजेगाव ही शाळा आडवळणी आहे, तसेच शेंदुर्जन गावापासून आठ किमी तर सुलतानपूरपासून १० किमी अंतरावर आहे. कोणतीही प्रवासाची व्यवस्था नाही. रस्त्यापासून खूप आत हायस्कूल आहे. दाट झाडीतून समाेर हायस्कूल आहे की शेती, हेसुद्धा दिसत नाही. तरीही या कनिष्ठ महाविद्यालयाची पटसंख्या परिसरात सर्वाधिक आहे. या केंद्रावर परीक्षार्थी हायफाय वाहनातून येतात आणि जातात, त्यामुळे शिक्षण विभागाची संशयाची सुई राजेगाव परीक्षा केंद्रावर दाखविली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"