खामगावच्या निवारागृहात परप्रांतीय मजुरांना पोलिसाकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 11:28 AM2020-05-09T11:28:55+5:302020-05-09T16:43:29+5:30
निवारा गृहातील ५१ परप्रांतीय मजुरांना शुक्रवारी उशीरा रात्री एका पोलिसाने जबर मारहाण केली.
अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : येथील निवारागृहात क्वारंटाईन करण्यात आलेल्या परप्रांतीय मजूरांना एका पोलिसाने बळजबरी मारहाण केली. शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकारामुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिस प्रशासनाने या संपूर्ण प्रकाराची चौकशी सुरू केली आहे.
कोरोना संचारबंदी काळात पायी गावी जाणाºया १०७ जणांना खामगाव येथील शासकीय वस्तीगृहात १ एप्रिलच्या दरम्यान क्वारंटाईन करण्यात आले. दरम्यान, यातील राज्यातील ३६ मजुरांना सोडण्यात आले. त्यानंतर ७१ परप्रांतिय मजूर येथे वास्तव्यास होते. त्यानंतर मजुरांना या निवारागृहातून तपासणीनंतर सुटी देण्यात आली. शुक्रवारी ३ जणांना येथून सोडण्यात आले. तर मध्यप्रदेशातील आणखी तिघांच्या सुटीची प्रक्रीया शुक्रवारी पूर्ण करण्यात आल्यानंतर निवारागृहात झारखंड आणि बिहार राज्यातील ५१ जण या निवारागृहात वास्तव्यास होते. रात्रीचे जेवण केल्यानंतर हे मजूर आपआपल्या रूममध्ये झोपी गेले असता कर्तव्यावर असलेल्या पोलिसाने अश्लिल शिवीगाळ करीत स्वत:जवळील पट्ट्याने काही मजूरांना मारहाण केली. काही जणांच्या हातावर, काहींना पाठीवर, मांडीवर तर काहींच्या गुप्तांगावर या मारहाणीत जखमा झाल्या. शनिवारी सकाळी हा प्रकार उजेडात आल्यानंतर प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांना निवारागृहाच्या आवारात येण्यास मज्जाव केला. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काही पत्रकार घटनास्थळी पोहोचले. याठिकाणी निवारागृहातील परप्रांतिय मजुरांनी आपबिती कथन केली. मारहाणीचे घाव पत्रकारांना दाखविले.
लोकप्रतिनिधींकडून दखल!
निवारागृहात परप्रातींय मजुरांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र देशमुख घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत अॅड. विरेंद्र झाडोकारही पोहोचले. त्यानंतर माजी आमदार दिलीपकुमार सानंदा ही तेथे दाखल झाले. लागलीच काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण आणि आरोग्य अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे, पिंपळगाव राजा आरोग्य केंद्राचे डॉ. अरुण पानझाडे आपल्या पथकासह तेथे दाखल झाले.
अप्पर पोलिस अधिक्षकांकडून चौकशी!
या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, तहसीलदार शीतल रसाळ, शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल हुड आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मजुरांकडून घडलेल्या प्रकाराची हकीकत जाणून घेतली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांकडून माहिती घेतली.
पालकमंत्र्यांकडून आढावा!
खामगाव येथील घटनेचा पालकमंत्री ना. राजेंद्र शिंगणे यांच्याकडून दूरध्वनीवरून आढावा घेण्यात आला. अप्पर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत यांना भ्रमण दूरध्वनीवरून नि:पक्ष चौकशीचे निर्देश पालकमंत्री ना. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. तत्वूर्वी पालकमंत्र्यांनी नगरसेवक देवेंद्र देशमुख यांच्याकडून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. या घटनेबाबत माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी या घटनेची माहिती पोलिस महानिरिक्षक मकरंद रानडे यांना भ्रमण दूरध्वनीवरून दिली.
निवारागृहातील परप्रांतियांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन केल्या जाते. याबाबत महसूल विभागाकडे तक्रारी केली आहे. शुक्रवारी रात्री त्यांचे आपआपसात भांडण झाले. त्यात ते जखमी झाले असावेत. निवारागृहातील कोणत्याही परप्रांतीय मजुराला मारहाण करण्यात आली नाही.
- बाळकृष्ण फुंडकर
पोलिस कर्मचारी, खामगाव.
रात्री झोपेत असताना पोलिस कर्मचाºयाने अश्लिल शिविगाळ करीत मारहाण केली. यावेळी काही जण जिवाच्या आंकाताने आक्रोश करीत होते. आमची इतर कोणत्याही पोलिसाविरोधात तसेच येथील नागरिकाविरोधात कोणतीही तक्रार नाही.
- मनोज उराव
परप्रांतीय मजूर, निवारागृह, खामगाव.
पोलिस प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याच्या प्रयत्न परप्रांतीय मजुरांना मारहाण करणाºया पोलिसाने केला आहे. या पोलिसाची वर्तणुक नेहमीच अरेरावीची असते. त्यामुळे संबंधित पोलिसास तात्काळ निलंबित केले जावे. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.
- दिलीपकुमार सानंदा
माजी आमदार, खामगाव