बुलढाणा जिल्ह्यातील १६ गुन्ह्यांचा पोलिसांनी लावला छडा; पाच आरोपी जेरबंद
By अनिल गवई | Published: January 29, 2024 10:36 PM2024-01-29T22:36:48+5:302024-01-29T22:37:33+5:30
शहर पोलिस स्टेशन हद्दीतील चार गुन्ह्यांचा समावेश
खामगाव : शहर आणि जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या दोन जबरी चोरींसह १४ घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच आरोपी जेरबंद केले असून, आणखी चार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. या कारवाईत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मुद्देमाल जप्त केल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांनी शहर पोलिस स्टेशनमध्ये पत्र परिषदेत दिली.
जिल्ह्यात घडलेल्या चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांची गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात पथके गठीत करण्यात आली. यात अधिनस्त पोलिस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी स्वतंत्र समांतर तपास पथके तयार करून विविध गुन्ह्यांचा शोध घेण्यात आला. यामध्ये बाबासाहेब कोल्हापुरे शिंदे (२२, रा. वीरेगाव तांडा, ता. जालना), विलास साहेबराव पवार (२५, रा. रामपुरी, ता. गेवराई, जि. बीड), अमोल सुरेश पवार (१९, रा. मंगरूळ, ता. घणसावंगी, जि. बीड), दीपक मारुती शिंदे (२०, रा. वीरेगाव तांडा, ता. जि. जालना), पांडू गंगाराम पवार (रा. मंगरूळ, ता. घनसावंगी) या पाच आरोपींना अटक करण्यात आली. तर आणखी चार आरोपींचा शोध सुरू आहे. या आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांचा छडा लागण्याची शक्यता थोरात यांनी वर्तविली. या पत्रपरिषदेला स्थानिक गुन्हे शाखेचे अशोक लांडे, शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पोलिस स्टेशननिहाय गुन्ह्यांचा छडा
खामगाव शहर - घरफोडीचे - ०४ गुन्हे.
बोराखेडी- घरफोडी - ०१ व जबरी चोरी - ०१ गुन्हा.
चिखली - घरफोडी- ०३ गुन्हे.
डोणगाव- घरफोडी - ०३ गुन्हे.
बुलढाणा शहर - जबरी चोरी ०१ गुन्हा.
मेहकर- घरफोडी ०१ गुन्हा.
देऊळगाव राजा - घरफोडी - ०१
अकोट, जि. अकोला- घरफोडीचा प्रयत्न - ०१
पावणेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
कारवाईत सहा लाख ५१ हजार रुपये किमतीचे १०५ ग्रॅम सोने, २० हजार रुपये किमतीची २६४ ग्रॅम चांदी आणि गुन्ह्याशी संबंधित हत्यारे मुद्देमाल, असा एकूण सहा लाख ७१ हजार ०६४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.