पीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिका-यास पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 01:29 PM2018-06-26T13:29:11+5:302018-06-26T13:32:46+5:30
पीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणा-या मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शाखाधिकारी राजेश हिवसेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
खामगाव : पीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणा-या मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शाखाधिकारी राजेश हिवसे यास खामगाव न्यायालयात मंगळवारी ( 26 जून) सकाळी ११.३० वाजता हजर करण्यात आले. आरोपी बँक अधिका-यास न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मलकापूर तालुक्यातील उमाळी गावातील शेतकरी त्याच्या पत्नीसोबत पिक कर्जासाठी दाताळा येथील सेंट्रल बँकेत गेला होता. कागदपत्रांची तपासणी करून तुमचा मोबाइल नंबर द्या, अशी सूचना बँक व्यवस्थापकाने केली होती. त्या अनुषंगाने संबंधित शेतक-याने त्याच्या पत्नीचा मोबाइल नंबर दिला. त्यावर शाखाधिका-याने अश्लिल संभाषण करून शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार मलकापूर पोलिसात नोंदविली होती.
महिलेच्या तक्रारीवरून सेंट्रल बँकेचे शाखाधिकारी राजेश हिवसे व शिपाई मनोज चव्हाण या दोघांविरोधात अपराध नं. १०८ /१८ कलम ३५४ अ, (२), भादंवि, सहकलम ३ (१), (डब्ल्यू) (१),३ (१),(डब्ल्यू) (२) अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. घटनेनंतर आरोपी बँक व्यवस्थापक राजेश हिवसे व शिपाई मनोज चव्हाण फरार झाला होता. पोलिसांनी शिपायास दोन दिवसापूर्वीच अटक केली आहे. बँक व्यवस्थापक राजेश हिवसे यास नागपूरात पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली होती. त्यास मंगळवारी सकाळी ११.३० वाजता जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यास न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.