पेपरफुटीप्रकरणी दाेन संस्थाचालकांसह पाच आराेपींना पाेलिस काेठडी
By संदीप वानखेडे | Published: March 5, 2023 07:05 PM2023-03-05T19:05:24+5:302023-03-05T19:06:05+5:30
आराेपींची संख्या वाढणार : व्हाॅट्सॲपवर ग्रुप तयार करून व्हायरल केला पेपर
साखरखेर्डा (बुलढाणा) : इयत्ता बारावीच्या गणिताचा पेपर फाेडल्याप्रकरणी पाेलिसांनी दाेन संस्थाचालकांसह पाच आराेपींना ४ मार्च राेजी रात्री अटक केली़ या आराेपींना ५ मार्च राेजी न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने त्यांना १० मार्चपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे़ दरम्यान, या प्रकरणात अनेक खुलासे हाेत असून, दाेन शिक्षकांनी व्हाॅट्सॲपवर ग्रुप तयार करून त्यावरून पेपर व्हायरल केल्याचे पाेलिसांच्या तपासात समाेर आले आहे. यामध्ये आराेपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे़
सिंदखेडराजा तालुक्यात ३ मार्च राेजी इयत्ता बारावीचा गणित विषयाचा पेपर समाजमाध्यमावर व्हायरल झाला हाेता. या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिंदखेड राजा पाेलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरण साखरखेर्डा पाेलिसांकडे वर्ग केले आहे. साखरखेर्डा पाेलिसांनी या प्रकरणाचा तपास करीत पाच ते सहाजणांना ४ मार्च राेजी ताब्यात घेतले हाेते. पेपरफुटीमध्ये प्रत्यक्ष सहभाग आढळल्याने गजानन शेषराव आडे, गाेपाल दामाेधर शिंगणे, गणेश बद्रीनाथ पालवे, पवन सुधाकर नागरे, गणेश शिवानंद नागरे यांना रात्री उशिरा पाेलिसांनी अटक केली़ दरम्यान, ५ मार्च राेजी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १० मार्चपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे़
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"