दिल्ली येथून परतलेल्यांची पोलिसांकडून चौकशी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 10:37 AM2020-04-07T10:37:18+5:302020-04-07T10:37:29+5:30
मोबाईल ट्रेस करण्यात आले असून पोलिसांकडून संबधितांची चौकशी सुरु झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमाला गेलेल्या ‘त्या’ संबधित व्यक्तींची माहिती संग्रहीत केली जात आहे. अशा व्यक्तींचे मोबाईल ट्रेस करण्यात आले असून पोलिसांकडून संबधितांची चौकशी सुरु झाली आहे.
कोरोना व्हायरसने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यात दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले अनेक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. त्या धर्तीवर दिल्ली येथे आढळून आलेल्या मलकापूर, नांदुरा, मोताळा तालुक्यातील मोबाईलधारकांची पोलिसांच्या वतीने चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. कोरोना व्हायरस जगभरात घातक ठरत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. त्याला १५ दिवस देखील झाली आहेत.
मार्च महिन्यात दिल्लीत धार्मिक कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये राज्यभरातून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यासंदर्भात खबरदारी म्हणून केंद्र सरकारने दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमाच्या त्या दोन्ही ठिकाणच्या तसेच रेल्वे स्थानक परीसरात त्या काळात उपस्थित सर्व नागरिकांचे मोबाईल ट्रेस करून तशा याद्या राज्य सरकारच्या गृहमंत्रालयाला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्या परिसरात वेगवेगळ्या कामानिमित्ताने गेलेल्या नागरिकांचे मोबाईल नंबर देखिल केंद्र सरकारच्या गुप्तचर विभागाला प्राप्त झाल्याने त्या याद्या राज्य सरकारच्या गृहमंत्रालयाला पाठविण्यात आल्या आहेत. अर्थात ही प्रक्रिया राज्यभर सुरू आहे. त्याच धरतीवर मलकापूर, नांदुरा, मोताळा तालुक्यातील वेगवेगळ्या समाजाच्या मात्र त्या काळात दिल्लीत गेलेल्यांचा मोबाईलद्धारे ट्रेस करून खबरदारीसाठी त्यांच्या कोरोना टेस्ट करण्यासाठी पोलिस प्रशासन सरसावले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोरोनाचे रुग्ण पॉझिटीव्ह आल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या ठिकाणी कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले तो भाग सील करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)