पोलिसांनी मारहाण केल्यानेच मृत्यू !
By admin | Published: November 17, 2014 12:40 AM2014-11-17T00:40:41+5:302014-11-17T00:40:41+5:30
चाँदशाह मृत्यूप्रकरण : नातेवाइकांचा आरोप.
शेगाव (बुलडाणा) : पोलिसांच्या ताब्यातील आरोपीच्या मृत्यूप्रकरणाने आता वेगळीच कलाटणी घेतली असून, आरोपींसह पोलिसांनी मारहाण केल्याने चाँदशाह यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.
अमिरशाह आणि इकरारखाँ यांच्यातील दोन गटांमध्ये शौचालय बांधण्याच्या कारणावरून ५ नोव्हेंबर रोजी वाद निर्माण होऊन हाणामारी झाली होती. यामध्ये दोन्ही गटांतील तीन जण जखमी झाल्यानंतर शेगाव पोलीसांनी दोन्ही गटांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. यामध्ये शाह गटातील चार जणांना ७ नोव्हेंबर रोजी अटक करून शेगाव न्यायालयासमोर हजर केले. आरोपींमधील चाँदशाह सुभानशाह (६५) यांची प्रकृती खालावल्याने न्यायालयाने सुनावणी सुरू असताना आरोपीला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला प्रथम शेगाव येथील एका खासगी रुग्णालयात व त्यानंतर अकोला येथे हलविले. चाँदशाह यांचा ११ नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. याशिवाय पोलिसांच्या ताब्यातील आरोपीचा मृत्यू झाल्याने सीआयडीनेही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. यादरम्यान आरोपीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी यवतमाळ येथे करण्यात आली. उत्तरीय तपासणीचा अहवाल येणे बाकी आहे.
दरम्यान, आज रविवारी मृतक चाँदशाह यांचे नातेवाईक अमीरशाह महमूदशाह, हाजी अतिकशाह, जावेदशाह आदींनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. इकरारखाँ यांनी पैशांच्या जोरावर सहायक पोलिस निरीक्षक तावडे यांना ह्यमॅनेजह्ण केले आणि चाँदशाह यांना पोलिस कस्टडीत जबर मारहाण करण्यात आली. धमक्या दिल्याने ते मरण पावले., असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.