पोलीस पाटील करणार उपोषण
By admin | Published: July 15, 2017 12:20 AM2017-07-15T00:20:50+5:302017-07-15T00:20:50+5:30
चिखली : जिल्ह्यातील पोलीस पाटील २१ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : पोलीस प्रशासन व जनतेतील महत्त्वाचा दुवा असलेल्या पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्या या पावसाळी अधिवेशनात मान्य व्हाव्यात, यासाठी जिल्ह्यातील पोलीस पाटील २१ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
महाराष्ट्र ग्राम पोलीस पाटील अधिनियम १९६७ मध्ये सुधारणा करण्यात यावी, पोलीस पाटीलपद हे एका विभागाशी संलग्न ठेवण्यात यावे व दरमहा १० हजार रुपये मानधन देण्यात यावे, यासह प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनद्वारे राज्यातील पोलीस पाटलांनी वेळोवेळी निवेदन देऊन, प्रत्यक्ष भेटी, चर्चा तसेच हिवाळी अधिवेशनादरम्यान ७० विधानसभा सदस्यांना व २५ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही पोलीस पाटलांच्या मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी २१ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे. तसे निवेदन जिल्हाधिकारी बुलडाणा यांना देण्यात आले. यावर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष भारत शिंदे व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.