पोलिसांनी रोखला बालविवाह !
By Admin | Published: July 3, 2017 02:06 PM2017-07-03T14:06:23+5:302017-07-03T14:09:25+5:30
वीस मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पळा.. रे पळा..! पोलिस गाडी आली.. म्हणत वऱ्हाडींची धावपळ उडाली़
ब्राम्हणी : रविवारी दुपारचे बारा वाजण्याकडे काटा झुकत होता़ लग्नाची घटिका जवळ येत होती़ अचानक मंडपातील एकाने राहुरी पोलीस स्टेशनला मोबाईवरून अल्पवयीन मुलीच्या विवाहाची खबर दिली़ वीस मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पळा.. रे पळा..! पोलिस गाडी आली.. म्हणत वऱ्हाडींची धावपळ उडाली़ पोलिसी खाक्या दाखविताच वधू-वराच्या नातेवाईकांनी दोन पाऊले मागे घेत लग्नावर पाणी सोडले़ लेखी घेत पोलिसांनी नातेवाईकांना समज देऊन सोडले़
ब्राम्हणी येथील तोडमल वस्तीवर थोड्याच वेळात अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना रविवारी दुपारी मिळाली़ लागलीच पोलीस उपनिरीक्षक बालाजी शेंगेपल्लू, पोलीस हेड कॉन्स्टेबल एस़ आऱ बहिरवाल, दिवटे व नेटके घटनास्थळी दाखल झाले़ पोलिसांनी वधू-वराकडील नातेवाईकांचे प्रबोधन केले़ तरी देखील त्यांचे परिवर्तन होण्याचे चिन्हे दिसेना़ अखेर खाकी वर्दीचा सज्जड इशारा दिल्यानंतर लग्न रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले़
बँड पथक, मंडपवाले, आचाऱ्यांनी ठोकली धूम
ब्राम्हणी येथील २७ वर्षाचा मुलगा व मढी येथील १४ वर्षांची मुलगी यांचा विवाह थांबविण्यासाठी पोलिसांचे मंडपात आगमन होताच मंडपवाला, भटजी, बँडपथक, आचारी यांनी लग्नमंडपातून धूम ठोकली़ पोलीस दाखल झाल्याने वधू-वरांना शुभमंगल सावधान होण्यापूर्वीच माघार घ्यावी लागली़ कोणत्या नातेवाईकाने पोलिसांने कळविले याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला़ परंतु फोन करणारा गुलदस्त्यातच राहिला़
वधू-वरांचे केले प्रबोधन
ब्राम्हणी येथे अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती निनावी फोनव्दारे कळाली़ घटनास्थळी गेल्यानंतर मुलीचे वय १४ तर मुलाचे वय २७ असल्याचे आढळून आले़ वधू-वरांना कायद्याची बाजू सांगून प्रबोधन करण्यात आले़ लेखी घेण्यात आले असून अल्पवयीन मुलगी असल्याने साखर पुड्यात होणार विवाह रद्द करण्यात आला, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांनी सांगितली़