सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या खात्यातून दोन लाख काढणाऱ्या भामट्यास पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:33 AM2020-12-31T04:33:21+5:302020-12-31T04:33:21+5:30
एक डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. बुलडाणा येथील सर्क्युलर रोडवरील जिजामाता नगरातील सेवानिवृत जिल्हा मार्केटिंग अधिकारी विकास मल्लिकार्जुन ...
एक डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. बुलडाणा येथील सर्क्युलर रोडवरील जिजामाता नगरातील सेवानिवृत जिल्हा मार्केटिंग अधिकारी विकास मल्लिकार्जुन क्यावल यांचे आयडीबीआय बँकेत खाते आहे. ते सेवानिवृत्त झाल्याने २७ नोव्हेंबर रोजी त्यांच्या खात्यात पाच लाख दोन हजार ७८७ रुपये पीएफची रक्कम आरटीजीएसद्वारे जमा झाली होती. ३० नोव्हेंबर रोजी क्यावल यांनी बुलडाणा येथील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममधून पाच हजार रुपये एटीएमद्वारे काढले होते. मात्र, त्यांचे एटीएम कार्ड तेथेच विसरले होते. हे एटीएम अज्ञात चोरट्याच्या हाती लागले होते. ही संधी साधत चोरट्याने बुलडाणा, मोताळा, मलकापूर व जळगाव खान्देश येथे विविध एटीएममधून जवळपास २० वेळा पैसे काढले. सर्व मिळून एकूण दोन लाख सहा हजार ६०० रुपयांची रक्कम काढली होती. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी सीसी कॅमेऱ्याचे फुटेज व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मोठ्या खुबीने आरोपी काशीनाथ प्रभू चव्हाण (३५) यास जळगाव खान्देशमधून अटक केली. ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी माधव पेठकर, अमोल शेजोळ व महादेव इंगळे यांनी काशीनाथ चव्हाण यास ३० डिसेंबर रोजी अटक केली. त्याला बुलडाणा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.