कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सदैव तत्पर राहावे : शिंगणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:30 AM2021-02-15T04:30:31+5:302021-02-15T04:30:31+5:30
पोलीस कवायत मैदानानजीकच्या प्रभा सभागृह येथे अनुकंपा तत्त्वावर पोलीस शिपाई पदावर नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती प्रमाणपत्र प्रदान ...
पोलीस कवायत मैदानानजीकच्या प्रभा सभागृह येथे अनुकंपा तत्त्वावर पोलीस शिपाई पदावर नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती प्रमाणपत्र प्रदान करण्याच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे प्रामुख्याने उपस्थित होते.
येणारी शिवजयंती कोविड आजाराच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन करीत पालकमंत्री म्हणाले की, शिवजयंती साधेपणाने साजरी करण्यात यावी. यासाठी सर्वत्र जनजागृती करावी. माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांनी पोलीस यंत्रणा बळकट करण्यासाठी प्रयत्न केले. त्या अनुषंगाने राज्यातील पोलीस यंत्रणा कायदा व सुव्यवस्था राखण्यास सक्षम असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी कार्यक्रमामागील आयोजनाची भूमिका विशद केली. याप्रसंगी पोलीस विभागातून पोलीस अंमलदार या पदावरून पोलीस उपनिरीक्षक पदावर एमपीएससी विभागीय परीक्षेतून निवड झालेले अंमलदार यांचा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये रमेश दळवी, नानाभाऊ काकड, विष्णू बोडखे, शेख अख्तर शेख सत्तार व संदीप बालोद यांचा समावेश आहे.
तसेच अनुकंपा तत्त्वावर भरतीतील उमेदवारांना पोलीस शिपाई या पदावर नेमणूक देण्यात आली आहे. अशा सर्वांना पालकंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पोलीस दलात ३१ जणांना नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस शिपाई नीलेश रत्नपारखी यांनी केले. अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.