‘शुभ मंगल सावधान’...ऐवजी पळा...पळा पोलीस आले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 11:46 AM2021-04-28T11:46:26+5:302021-04-28T11:59:49+5:30
Violation of Rule : सभारंभातील व्यक्तीसंख्या मर्यादेपेक्षा अधिक झाल्याने वधू पित्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : व्यक्ती संख्या आणि वेळेच्या मर्यादेचे उल्लघंन करणाऱ्या २०० पेक्षा अधिक वऱ्हाड्यावर विवाह सोहळा सोडून धूम ठोकण्याचा बाका प्रसंग आला. ‘शुभ मंगल सावधान’...ऐवजी पळा...पळा पोलीस आले...म्हणत लग्नसमारंभातील आबालवृध्दांनी मिळेल त्या दिशेने एकच धूम ठोकली. तर जनुना येथील एका सोहळ्यात पथकाच्या समोरच वऱ्हाड्यांचा ॲाटो आला. सभारंभातील व्यक्तीसंख्या मर्यादेपेक्षा अधिक झाल्याने वधू पित्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत २५ व्यक्तींपर्यतच्या मर्यादेत दोन तासाच्या आत विवाह सोहळा आटोपण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, ग्रामीण भागात नियम डावलून विवाह सोहळे पार पडत आहेत. त्यामुळे अशा विवाह सोहळ्यांवर पोलिसांचा वॉच असून, रविवारी खामगाव- शेगाव रोडवरील एका खेड्यातील लग्न समारंभात सहभागी झालेल्या २०० पेक्षा जास्त वऱ्हाड्यांना विवाह अर्ध्यावर सोडून वाट मिळेल त्या दिशेने पळ काढावा लागला वऱ्हाड्यांनी ऐनवेळी धूम ठोकल्याने, पोलिस आणि पथकाची कारवाई टळली असली तरी, वऱ्हाड्यांना लग्न सोडून धूम ठोकण्याची नामुष्की पत्करावी लागली. हा प्रकार आता ग्रामीण भागात चांगलाच चर्चिल्या जात आहे.
काही वऱ्हाड्यांनी गावातील आणि ओळखीच्या घरात आसरा घेतला होता. बराच वेळ पोलीस लग्नस्थळी हजर होते. त्यामुळे अनेकजण लग्नस्थळी न जाता परत आपापल्या गावी परतल्याची जोरदार चर्चा गावात होत आहे.
वऱ्हाडी म्हणून आलेल्या पोलिसांनाही ओळखले!
n शेगाव तालुक्यातील चिखली खुर्द येथील एका लग्न समारंभात गत आठवड्यात पोलीस वऱ्हाडी म्हणून सहभागी झाले. त्यानंतर वधू आणि वरपित्यावर कारवाई करण्यात आली. तशीच शक्कल शेगाव पोलीसांनी या विवाह सोहळ्यातही लढविली. मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेने पोलिसांचे प्रयत्न निष्फळ ठरले. पोलिसांची कारवाईची व्यूहरचना गावकऱ्यांनी उलथुन लावली.
निरोप्यांनी हाणून पाडला पोलिसांचा बेत !
शेगाव पोलिसांनी गाडी मुख्य रस्त्यावर ठेवली. सिव्हील ड्रेसमध्ये गाव गाठले. मात्र, गाडी उभी केल्यानंतर गावात पायी जात असलेले पोलीस गावातील नागरिकांच्या चाणाक्ष नजरतेून सुटू शकले नाहीत. फाट्यावर तैनात असलेल्या निरोप्यांनी पोलीस गावात पोहोचण्यापूर्वीच ‘निरोपा’ची मोहीम फत्ते केली. त्यामुळे वऱ्हाडी म्हणून गावाच्या वेशीवर गेलेल्या पोलिसांना कारवाई विनाच पोहचावे लागले.
वेळेवरील ‘योगायोग’ पडला महागात!
सोमवारी खामगाव येथील एक विवाह सोहळा जनुना देवीवर पार पडला. विवाह सोहळा सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलीसांना मिळताच, पोलिसांचे एक पथक लग्नस्थळी पोहोचले. पथक पोहोचता क्षणी विवाह मंडपात मर्यादित संख्येत वऱ्हाडी होते. त्यामुळे पथक परतण्याच्या मार्गावर होते. मात्र, त्याचवेळी एका ऑटोतून मुलीकडील सात महिला वऱ्हाडी लग्नस्थळी अचानक पोहोचल्या. या सात महिलांमुळे लग्न समारंभातील वऱ्हाडी संख्या ३२ वर पोहोचली. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी संबंधितांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.
कारवाईसाठी आलेल्या पोलिसांचे आदरातिथ्य!
सिव्हील ड्रेसवर कारवाईसाठी लग्नस्थळी पोहोचलेल्या आणि निरोप्यांनी ओळखलेल्या दोन पोलिसांचे वऱ्हाडी नियोजित स्थळावरून गायब झाल्यानंतर आदरातिथ्य करण्यात आले. पाहुणे म्हणून दोन पोलिसांना लग्नस्थळी जेवण आणि रोडवर उभ्या गाडीत असलेल्या पथकासाठी ‘शिदोरी’ देत वधू पित्याने आपले ‘कर्तव्य’ निभविले.