पालिका सभागृहाचा झाला राजकीय "आखाडा"

By admin | Published: May 22, 2017 07:51 PM2017-05-22T19:51:47+5:302017-05-22T19:51:47+5:30

नगरसेविका भिडल्या: नगरसेवकांमध्ये बाचाबाची!

Political Hall of the House "Akhaada" | पालिका सभागृहाचा झाला राजकीय "आखाडा"

पालिका सभागृहाचा झाला राजकीय "आखाडा"

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहरातील व्यायाम शाळेचा गैरकायदेशीर ताबा घेतल्याप्रकरणी संबंधितांविरोधात तक्रारीचे प्रारूप ठरविण्याकरीता आयोजित सभेत सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक आमने-सामने ठाकले. यावेळी प्रचंड गदारोळ झाल्याने, सोमवारी सायंकाळी पालिका सभागृहाला चक्क राजकीय आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले. दरम्यान, संख्याबळाच्या आधारे शिवाजी व्यायाम शाळेसंबधी तक्रारीच्या प्रारुपाला मंजुरी देण्यात आली.
खामगाव शहरातील जुन्या वार्ड क्रमांक २५ मध्ये असलेल्या शिवाजी व्यायाम मंदीराच्या गैरकायदेशीर ताब्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन सुरू आहे. या व्यायामशाळेच्या दुरूपयोगाप्रकरणी सोमवारी पालिकेची विशेष सभा बोलाविण्यात आली. यासभेत व्यायाम शाळेच्या दुरूपयोगाप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी उपाध्यक्ष संजय मुन्ना पुरवार सूचक असलेल्या प्रारुपाचे सभागृहात वाचन करण्यात आले. या प्रारूप वाचनाला सुरूवात होताच विरोधी नगरसेवकांनी गोंधळाला सुरूवात केली. तत्पूर्वी व्यायाम शाळेच्या दुरूपयोगाप्रकरणी नियमानुसार तक्रार दाखल करण्यात हरकत नसल्याची मुख्याधिकाऱ्यांच्या टिप्पणीचेही वाचन करण्यात आले. त्यावेळी विरोधकांकडून विस्तृत टिप्पणी वाचन करण्याचा आग्रह धरण्यात आला. विस्तृत टिप्पणीचे वाचन होताच, सत्ताधाऱ्यांनी तक्रारीच्या प्रारुपाला मंजुरी दिली. त्यावेळी विरोधकांनी उपसूचना गृहीत धरण्याची विनंती सभागृहाला केली. विरोधकांची लेखी उपसूचना सभागृहात दाखल झाल्यानंतर नगराध्यक्षांनी उपसूचनेचे सूचक नगरसेवक भूषण शिंदे यांना उपसूचनेवर बोलायला सांगितले. त्यावेळी शिंदे यांनी उपसूचनेचे थेट वाचन सुरू केल्याने नगराध्यक्षांनी त्यांना थांबविले. नियमानुसार उपसूचना वाचता येत नसल्याचे सांगताच विरोधकांनी सभागृहात गोंधळ केला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक भिडले. विरोधकांनी आपली बाजू लावून धरण्यासाठी तर, सत्ताधाऱ्यांनी मतदाना घेण्यासाठी सभागृहात गोंधळ केला. दोन्ही बाजूकडून आरडा-ओरड सुरू झाली. त्याचवेळी मतदान घेत, नगराध्यक्षांनी सभा संपविल्याने, विरोधकांनी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी नगरसेविकांमध्ये बाचाबाची देखील झाली.

Web Title: Political Hall of the House "Akhaada"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.