आचारसंहितेत राजकीय पक्षांचा आंदोलनावर जोर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 04:36 PM2020-11-23T16:36:57+5:302020-11-23T16:37:34+5:30
राजकारणी आणि पोलीस प्रशासनाला निवडणूक आचारसंहितेचाही विसर पडल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोविड-१९ आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अंत्यंत गरजेचे असतानाही शहरात या कायद्याची जागोजागी पायमल्ली केली जात आहे. त्याचवेळी शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक आचारसंहितेचाही राजकारणी आणि पोलीस प्रशासनाला विसर पडल्याचे दिसून येते. उल्लेखनिय म्हणजे नियम मोडणाऱ्या राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह सामान्यांवर कारवाई करण्याचा पोलिस आणि संबधित प्रशासनाला सोयीस्करपणे विसर पडल्याचे चित्र खामगावात सर्वत्र दिसून येत आहे.
शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे विविध आंदोलन तसेच पूर्वपरवानगीशिवाय सभा घेण्यास मनाई आहे. या शिवाय कोरोना आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत काही महत्वपूर्ण नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.
मात्र, खामगावातील राजकीय पुढाऱ्यांनी कोरोना आपत्ती व्यवस्थापन कायद्यासोबतच शिक्षक मतदारसंघ निवडणूक आचारसंहितेचाही विसर पडला असल्याचे दिसून येते. कोरोनासारख्या साथीच्या रोगाचा प्रसार होईल, याची जाण असतानाही खामगावात विनापरवानगी शिक्षक मतदारसंघासाठी प्रचार बैठका घेतल्या जात आहेत.
दरम्यान, गत आठवड्यात खामगावात एका राजकीय पक्षाकडून चूनभाकर आंदोलन करण्यात आले. थेट शासकीय कार्यालयातच हे आंदोलन झाल्याने आदर्श आचारसंहिता आणि कोविड व्यवस्थापन कायद्याचा भंग झाला. मात्र, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.