कर्जमाफीवरून जिल्ह्यात पुन्हा राजकीय रणकंदन
By admin | Published: July 12, 2017 01:04 AM2017-07-12T01:04:34+5:302017-07-12T01:04:34+5:30
काँग्रेस, शिवसेना व सुकाणू समिती आक्रमक : आंदोलनाची सुरुवात बुलडाण्यातून
विवेक चांदूरकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्यात पुन्हा काँग्रेसच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार असून, त्याची सुरुवात बुलडाण्यातून होणार आहे, तसेच शिवसेनेनेही भाजपला नामोहरम करण्याची संधी शोधली असून, जिल्हाभर आंदोलन करण्यात येत आहे. योसाबतच १६ जुलै रोजी जिल्ह्यात सुकाणू समितीची सभा होणार असून, सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात येणार आहे, त्यामुळे कर्जमाफीच्या मुद्यावरून पुन्हा जिल्ह्यात रणकंदन होणार आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा शासनाने केली; मात्र त्यामध्ये निकषांचा अडथळा आणल्याने विरोधकांना पुन्हा सरकारला कोंडीत पकडण्याची संधी मिळाली. कर्जमाफीची घोषणा होऊन पंधरा दिवस झाले असले, तरी अद्याप बँकेच्या अधिकाऱ्यांनाच नेमकी कर्जमाफी कुणाला द्यायची, हे कळले नाही. त्यामुळे शेतकरी वैतागले आहेत. शेतकऱ्यांच्या या मुद्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याकरिता विरोधी पक्ष सरसावले असून, आंदोलनांचे कर्जमाफीनंतर शमलेले वादळ पुन्हा उठणार आहे.
कर्जमाफीच्या मुद्यावरून काँग्रेस, शिवसेना व सुकाणू समिती आक्रमक झाली आहे. भाजपने दिलेली कर्जमाफी कशी फसवी असून, त्याचा शेतकऱ्यांना लाभ होणार नाही, हे शेतकऱ्यांना पटवून देण्याकरिता आता विरोधक सरसावले आहेत. १२ जुलै रोजी काँग्रेसच्यावतीने एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधान परिषदेतील उपसभापती माणिकराव ठाकरे यांची या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे. यासोबतच शिवसेनेही भाजपच्या कर्जमाफीच्या विरोधात जिल्हा अग्रणी बँकेसमोर ढोल बजावून निषेध नोंदविला, तसेच यानंतर ठिकठिकाणी आंदोलनही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शिवसेनेला भाजपला कोंडीत पकडण्यासाठी नामी संधी मिळाली असल्याने शिवसेना सरसावली आहे. काँग्रेस, शिवसेनेसोबतच सुकाणू समितीही खामगावला सभा घेऊन भाजपचा निषेध करणार आहे. संकुचित पक्षीय राजकारण विरहित सर्व शेतकऱ्यांची जिल्हाव्यापी भव्य शेतकरी एल्गार सभा १६ जुलै रोजी दुपारी १२.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून खा.राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, आ.बच्चू कडू, डॉ.अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, आ.जयंत पाटील, नामदेव गावडे, संजय पाटील उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सरकारने मात्र आपला शब्द फिरवीत शेतकऱ्यांशी विश्वासघात केला.
कर्जमाफीसाठी अत्यंत जाचक अटी लावल्या व शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप करीत समितीने पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या लढ्याच्या तयारीसाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने राज्याचा दौरा करण्याची घोषणा केली आहे.
१६ जुलै रोजी खामगाव येथून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. संपूर्ण राज्यभर या अंतर्गत ‘एल्गार सभा’ घेण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांची अभेद्य एकजूट बांधून लढ्याची घोषणा करण्यात येणार आहे.
‘एल्गार’चा प्रारंभ बुलडाण्यातून
राज्यात १५ लाखांपेक्षा कमी शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, फक्त ४.५ लाख शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होणार आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या फसव्या कर्जमाफी विरोधात काँग्रेस १२ जुलैपासून राज्यभर आंदोलन छेडणार आहे. त्याची सुरुवात बुलडाण्यातून होणार आहे, तसेच शेतकऱ्यांची सुकाणू समितीही राज्यभर आंदोलन पुकारणार असून, त्यांची सुरुवात १६ जुलै रोजी खामगावमधून करणार आहे. या दोन्ही आंदोलनांना प्रारंभ हा जिल्ह्यातूनच होणार आहे. जिल्ह्यात जिल्हाव्यापी शेतकरी एल्गार सभा आयोजित करण्यात येत आहे. १६ जुलै रोजी संपन्न होत असलेल्या या सभेसाठी राज्यभरातून शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
12 जुलै रोजी जिल्ह्यात काँग्रेसच्यावतीने आयोजित एल्गार कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. यानंतर राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.
16 जुलैपासून सुकाणू समितीच्यावतीने राज्यव्यापी एल्गार सभांना प्रारंभ होणार आहे. त्याची सुरूवात जिल्ह्यातील खामगाव येथूनच होणार आहे.
13 तालुक्यात शिवसेनेच्यावतीने ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. यासोबतच ग्रामीण भागातही ढोल वाजविण्यात आला.