जिल्ह्यातील राजकारण तापणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:14 AM2021-09-02T05:14:54+5:302021-09-02T05:14:54+5:30

बुलडाणा: जिल्ह्यातील ९ पालिकांची वर्षाखेर मुदत संपत असतानाच प्रभाग रचनेचा कच्चा मसुदा पालिकांनी बनविण्यास सुरुवात केलेली असून, राजकीय पक्षांनीही ...

Politics in the district will heat up | जिल्ह्यातील राजकारण तापणार

जिल्ह्यातील राजकारण तापणार

googlenewsNext

बुलडाणा: जिल्ह्यातील ९ पालिकांची वर्षाखेर मुदत संपत असतानाच प्रभाग रचनेचा कच्चा मसुदा पालिकांनी बनविण्यास सुरुवात केलेली असून, राजकीय पक्षांनीही या निवडणुकीसाठी व्यूहरचना आखण्यास प्रारंभ केल्याने आगामी दोन महिन्यांत जिल्ह्यातील नागरी भागातील राजकारण तापणार आहे. तब्बल सहा लाख लोकसंख्या असलेल्या नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आता हे राजकारण चांगलेच तापणार आहे. नववर्षाच्या प्रारंभी होणारी ही निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे बहुतांश पक्ष या निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे लढणार असले तरी स्थानिक पातळीवरील नेत्यांची मते विचारात घेऊन युती-आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवरच सोडण्यात येणार असल्याची सध्याची रणनीती महाविकास आघाडीतील घटक पक्षांची दिसते. त्यामुळे भाजपला या निवडणुकीत चांगलाच जोर लावावा लागण्याचे संकेत मिळत आहेत.

जिल्ह्यात पक्षीय बलाबल पाहता भाजप एक ताकदवान पक्ष दिसत असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचा वरचष्मा आहे. पालिकांमधील सदस्य संख्येवरूनही ते निदर्शनास येते. त्यामुळे काँग्रेस पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आपली ताकद पुन्हा एकदा अजमावणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान गेल्या दीड महिन्यापूर्वीच ही बाब अधोरेखित केलेली आहे. सध्या प्रशासक असलेल्या मोताळा आणि संग्रामपूर नगरपंचायतींच्याही निवडणुका आगामी काळात होण्याची शक्यता आहे.

--शिवसेनेची शनिवारी बैठक--

पालिका निवडणुकीच्या संदर्भाने शिवसेनेची शनिवारी खा. प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत असून, त्यात पालिका निवडणुकीसंदर्भातील रणनीती ठरविण्यात येणार आहे. जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहराध्यक्षांसह अन्य पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. पालिकांवर भगवा झेंडा फडकवण्यासाठीची व्यूहरचना यामध्ये ठरविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांनी सांगितले.

--काँग्रेसची रविवारी बैठक--

काँग्रेसचीही रविवारी शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद व अन्य काही पालिकांच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आढावा बैठक घेऊन पालिकांवर काँग्रेसचे प्रभुत्व निर्माण करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे पुनर्नियुक्त जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी सांगितले. काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढण्याची पूर्ण तयारी केली असून, गरजेनुरूप स्थानिक पातळीवरील नेत्यांची भूमिका विचारात घेऊन एखाद्ठिकाणी आघाडीचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

--भाजपही ताकद वाढविण्यास उत्सुक--

भाजपनेही सूक्ष्मस्तरावर पालिका निवडणुकीसाठी कंबर कसली असून त्यांच्या आढावा बैठका सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यातील महत्त्वाच्या पालिका आपल्या अधिपत्याखाली आणण्यासाठी भाजप उत्सुक आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरू असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. आकाश फुंडकर यांनी सांगितले.

--राष्ट्रवादीचीही तयारी--

राष्ट्रवादी काँग्रेसही पालिका निवडणुकीसाठी तयारी करत असून, जिल्ह्यातील सिंदखेड राजा, देऊळगाव राजाच्या बाहेर पडून पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ताकद वाढविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सोबतच प्रदेश पातळीवरील नेतेही आगामी काळात जिल्ह्यात दौरे करणार आहेत.

--असे आहे पालिकांमधील पक्षीय बलाबल--

नगर परिषद आणि नगर पंचायतमधील एकूण जागा :- ३०१

काँग्रेस :-१०३ (३४ %)

भाजप:- ७५ (२५ %)

शिवसेना:- ५१ (१७ %)

राष्ट्रवादी काँग्रेस:- २१ (७ %)

एमआयएम:- ६ (२ %)

भारिप:- (वंचित बहुजन आघाडी):- १३ (४ %)

अपक्ष:- ३२ (११ %)

Web Title: Politics in the district will heat up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.