राजकारणामुळे अंगणवाडी इमारतींचे बांधकाम रखडले!
By admin | Published: July 11, 2017 12:04 AM2017-07-11T00:04:03+5:302017-07-11T00:45:42+5:30
पंचायत समितीचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : ग्रामीण भागातील गोर-गरिबांच्या घरची चिमुकली शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना शिक्षणाची गोडी लागण्यासाठी शासनाने जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत ग्रामीण भागात अंगणवाड्या सुरू केल्या आहेत. अंगणवाडीच्या इमारत बांधकामासाठी शासन लाखो रुपये देत आहे; मात्र स्थानिक ग्रामपंचायत व राजकारणामुळे इमारत बांधकामाकडे दुर्लक्ष केले जात असून, जवळपास ७० टक्के अंगणवाड्या उघड्यावर भरत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत सन २०१५-१६ यावर्षी ग्रामीण भागात १६६ अंगणवाड्यांच्या इमारत बांधकामासाठी मंजुरी देण्यात आली होती. प्रत्येक इमारतीसाठी पंचायत समितीमार्फत सहा लाख रुपये निधी शासनाकडून देण्यात येतो; परंतु अनेक ग्रामपंचायतीने अंगणवाडीच्या इमारतीसाठी पाठपुरावा केला नाही, तसेच संबंधित पंचायत समितीनेही अंगणवाडीची इमारत बांधकामाचा प्रस्ताव पाठविला की नाही, संबंधित ग्रामपंचायतीची काय अडचण आहे, याबाबत माहिती घेतली नाही, त्यामुळे १६६ पैकी फक्त ४९ अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यात बुलडाणा तालुक्यातील ५१ पैकी १८ इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. चिखली १९ पैकी १० पूर्ण, मेहकर १७ पैकी ४ पूर्ण, मोताळा १३ पैकी ७ पूर्ण, मलकापूर १२ पैकी २ पूर्ण, नांदुरा ८ पैकी ३ पूर्ण, खामगाव २२ पैकी २ पूर्ण, शेगाव ४ पैकी ०, जळगाव जामोद ६ पैकी १ पूर्ण, संग्रामपूर ७ पैकी ०, देऊळगाव राजा ६ पैकी १ पूर्ण व सिंदखेड राजा तालुक्यात १ पैकी १ इमारतीचे काम पूर्ण झाले असून, एकूण १६६ पैकी ४९ म्हणजे ३० टक्के इमारतीचे काम पूर्ण झाले असून, ७० टक्के अंगणवाड्या उघड्यावर भरत असल्याचे दिसून येते. यावर्षी सन २०१६-१७ यावर्षीही १६६ अंगणवाडीच्या इमारतीसाठी मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे संबंधित पंचायत समिती व ग्रामपंचायतीने इमारत बांधकामासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
राजकारणाचा फटका
अंगणवाडी बांधकामासाठी संबंधित ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवून इमारत बांधकामासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे; मात्र अनेक ठिकाणी राजकारण आडवे येत असल्याचे दिसून येते. अंगणवाडी इमारतीसाठी निधी अल्प असल्यामुळे, इमारत बांधल्यानंतर काही शिल्लक राहत नसल्यामुळे तसेच तक्रारी दूर करताना त्रास होत असल्यामुळे अनेक पदाधिकारी अंगणवाडी इमारत बांधकामाकडे दुर्लक्ष करीत असून, जादा निधीच्या कामांकडे लक्ष देत असल्याचे दिसून येते.
गावाच्या फायद्यासाठी अंगणवाडी इमारत बांधकाम करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. याबाबत पाठपुरावा करण्यात येईल.
-सुनील मेहसरे,
उपमुकाअ, महिला व बालकल्याण विभाग, जि.प.बुलडाणा.