पूर्णा नदी पात्रात अधिकाऱ्यांची धडक
By admin | Published: May 31, 2017 12:27 AM2017-05-31T00:27:40+5:302017-05-31T00:27:40+5:30
अवैध रेती उपसा करणाऱ्यांचे साहित्य जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : २९ मे रोजी सायंकाळी काळेगाव शिवारातील पूर्णा नदीपात्रात महसुल विभागाच्यावतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धडक दिली .उपसा करणाऱ्यांनी पळ काढल्यामुळे अधिकाऱ्यांनी अवैध रेती ऊपसा करणारे साहित्य जप्त करीत सदर साहित्य शहर पोलीस स्टेशनमध्ये जमा केले. ही कार्यवाही सायंकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत चालली.
काळेगाव शिवारात पूर्णा नदीपात्रात अवैधरित्या रेती उपसा सुरू असल्याची बाब तलाठी व मंडळ अधिकारी यांनी प्रशासनाला कळविली. त्यावरून नायब तहसिलदार हेमंत पाटील, मंडळ अधिकारी पी.के.पाटील, तलाठी उगले हे पोलीस पथकासह नदीपात्रात धडकले.
दरम्यान उपसा करणाऱ्यांनी तेथून पळ काढला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पंपींग मशीन, डिझेल टाक्या, लोखंडी टाक्या, फावडे, कुदळ आदी साहित्य ताब्यात घेवून शहर पोलीस स्टेशनला जमा केले.
तत्पुर्वी या अधिकाऱ्यांची वाट अडविण्याचा प्रयत्नही काही अज्ञात लोकांकडून करण्यात आला. रात्रीच्या या प्रकारामुळे महसुल विभाग व रेती माफीयांमध्ये संघर्ष उभा राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान परतीच्या मार्गावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या वाटा अडविण्याचा प्रयत्नही वाटेत घडला.
या प्रकारामुळे आता महसुल विभाग व रेती माफीयांमध्ये संघर्ष उभा ठाकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.