मोताळा ते कोथळी मार्गाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:05 AM2021-02-06T05:05:31+5:302021-02-06T05:05:31+5:30
मोताळा ते कोथळी हा अतिशय वर्दळ असलेला मार्ग असून, या मार्गावर कोथळी, तरोडा, तारापूर, बोरखेडा, निमखेड, धामणगाव देशमुख, ...
मोताळा ते कोथळी हा अतिशय वर्दळ असलेला मार्ग असून, या मार्गावर कोथळी, तरोडा, तारापूर, बोरखेडा, निमखेड, धामणगाव देशमुख, सहस्रमुळी, पिंपळगाव नाथ, गिल्लोरी, रामगाव ही गावे येतात. मोताळा हे तालुक्याचे ठिकाण असून सर्व शाळा , विद्यालय, महाविद्यालय तसेच दवाखाने व सर्व शासकीय कार्यालय येथे आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक हे कामानिमित्त रोज मोताळा येथे येतात. या मार्गावर तीनचाकी ऑटो रिक्षा व दुचाकीसह इतर वाहनांची खूप वर्दळ असते. परंतु या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना या मार्गावर वाहन चालविणे खूप कठीण झाले आहे या मार्गावर खड्ड्यांचे प्रमाण इतके वाढले की खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे समजणे कठीण झाले आहे, तर येथे खड्डे चुकविण्याचा नादात लहान-मोठे अपघात हे नेहमी घडतात. कधी कधी खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनाचा ताबा सुटून वाहन दुसऱ्या वाहनांवर जाण्याचे प्रकारही घडत आहे आणि त्यावरून वाहनधारकांमध्ये शाब्दिक वाद होताना पहावयास मिळत आहे. वेळीच खड्डे न बुजविल्यास या मार्गावर मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी संबंधित विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन या मार्गावरील खड्डे बुजवून या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी येथील नागरिक करीत आहे.