मलकापुरात पक्के अतिक्रमण हटविले!
By admin | Published: March 9, 2016 02:33 AM2016-03-09T02:33:46+5:302016-03-09T02:33:46+5:30
जेसीबीचा हतोडा चालवून गोदाम तोडले.
मलकापूर (जि. बुलडाणा) : अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान नेहमीप्रमाणे पक्क्या स्वरुपातील बांधकाम काढल्या जाणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झालेली असतानाच ८ मार्च रोजी सायंकाळी आठवडी बाजारातील माजी नगराध्यक्ष बशीरखा बागवान यांच्या बंधुचे पक्क्या स्वरुपातील असलेल्या गोदामावर न.प. प्रशासनाच्यावतीने जेसीबीचा हतोडा चालवून गोदाम तोडण्याची कार्यवाही करण्यात आली. शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहीम प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने २४ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली. दरम्यान, अतिक्रमकांच्या अतिक्रमणातील साहित्याचे नुकसान होऊ नये म्हणून माणुसकीच्या दृष्टीने सदर साहित्य काढण्याची मुभा प्रशासनाच्यावतीने अतिक्रमकांना देण्यात आली होती. यामुळे अनेक टपरीवाल्यांनी आपले अतिक्रमण स्वयंस्फूर्तीने काढले, तर यामध्ये काही टपर्यांवर जेसीबीचा हतोडासुद्धा चालविण्यात आला. अत्यंत धिम्यागतीने चालत असलेल्या या अतिक्रमण हटाव मोहिमेवर भेदभावाचा प्रश्नही निर्माण झाला, असे असतानाच ८ मार्च रोजी दुपारी न.प. प्रशासनाच्यावतीने आठवडी बाजारातील अतिक्रमण हटावची कार्यवाही सुरू करण्यात आली. माजी नगराध्यक्ष बशीरखा बागवान यांच्या बंधुचे पक्क्या स्वरुपातील असलेल्या मोठय़ा गोदामामधील साहित्य काढण्याची मुभा देत सायंकाळी गोदामावर जेसीबीचा हतोडा चालवून गोदाम तोडण्याची कार्यवाही पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. यावेळी न.प. मुख्याधिकारी कुशल छाजेड, आरोग्य अधिकारी पराग रुले, बांधकाम अभियंता यवतकार यांच्यासह न. प. कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.