कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दयनीय अवस्था
By Admin | Published: May 25, 2017 12:50 AM2017-05-25T00:50:39+5:302017-05-25T00:50:39+5:30
जामोद : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षीही कांद्याला भाव नसल्याने उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च जास्त आल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जामोद : दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच शेतकरी त्रस्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षीही कांद्याला भाव नसल्याने उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च जास्त आल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. परिसरात रब्बी हंगामामध्ये नगदी पीक म्हणून कांद्याची लागवड करण्यात येते. कांदा लागवडीला शेत तयार करण्यापासून तर कांदा काढणीपर्यंत जवळपास ४६ हजार ८०० रुपये खर्च येतो. खर्चाचा हिशेब केला असता
नांगरणी ८०० रुपये, शेत सपाट करणे ५०० रुपये, सरी काढणे ५०० रुपये, कांद्याची रोपे तयार करणे १० हजार रुपये, कांदा लागवड खर्च ७ हजार रुपये, रासायनिक खत दोन वेळा ४ हजार रुपये, कांदा फवारणी ६ हजार रुपये, निंदन ५ हजार रुपये, पाणी देणे ३ हजार रुपये, कांदा काढणी १० हजार रुपये असा एका एकराला एकूण ४६ हजार ८०० रुपये खर्च आला; मात्र आज रोजी कांद्याची प्रत पाहून २५० ते ३२५ रुपये प्रति क्विंटल भाव सुरू आहे. कांदा पिकावर ३५ ते ४० हजार रुपयांचे एकरी उत्पन्न मिळत आहे. एकंदरीत जमा-खर्चाचा ताळमेळ केला असता, उत्पन्नापेक्षा ८ ते १० हजार रुपये खर्च जास्त झाला. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करता, कांदा पिकाला योग्य भाव देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.; मात्र कांद्याच्या कमी भावामुळे तोटा सहन करावा लागला. शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव नाही. शिवाय वारंवार येत असलेली अस्मानी संकटे व निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
यंदा दोन एकर कांद्याची लागवड केली होती. एकुण मिळालेले उत्पन्नापेक्षा १८ ते २० हजार रूपये खर्च जास्त झाला.
- अनंता लक्ष्मण ताडे, शेतकरी जामोद.