बुलडाणा जिल्ह्यातील मुक्या प्राण्यांचे उन्हामुळे बेहाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 05:09 PM2018-05-11T17:09:41+5:302018-05-11T17:09:41+5:30
बुलडाणा : जिल्ह्याचे सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर जात असल्याने जिल्ह्यातील ६ लाख ३० हजार गुरांना उष्माघातासह विविध आजारांचा धोका वाढला आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : जिल्ह्याचे सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर जात असल्याने जिल्ह्यातील ६ लाख ३० हजार गुरांना उष्माघातासह विविध आजारांचा धोका वाढला आहे. तळपत्या उन्हाचा पशुधनाला फटका बसत असून या कडाक्याच्या उन्हामुळे मुक्या प्राण्यांचे बेहाल होत आहेत. त्यामुळे उन्हाळी आजारांपासून जनावरांना वाचविण्यासाठी लसिकरण मोहिम वेगाने राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
मे महिना उजाडल्यापासून जिल्ह्याचे तपामान दिवसेंदिवस वाढतच जात आहे. सध्या बुलडाणा जिल्ह्याचे सरासरी तापमान ४० अंश सेस्लिअसच्यावर राहत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हापासून मानव विविध मार्गांनी आपला बचाव करून घेऊ शकतात; मात्र जनावरांना या कडक उन्हाचा फटका बसत आहे. जिल्ह्यात गायवर्गीय गुरे सहा लाख ३० हजारांच्या आसपास आहेत. त्यातील ३० टक्के गुरे ही प्रजननक्षम असल्याने त्यांच्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. चारा व पाणीटंचाईमुळे जिल्ह्यातील जनावरांची रानोमाह भटकंती सुरू आहे. त्यात पाण्याची व ओल्या चाºयाची कमतरता असल्याने जनावरांवर विपरीत परिणाम होत आहे. गत आठवड्यामध्ये जिल्ह्यातील मलकापूर जवळ विषारी गवत खाण्यात आल्याने सात गायी दगावल्याचा प्रकार समोर आला होता; त्यात वाढत असलेली उन्हाची तीव्रता, यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. जिल्ह्यात उन्हाचा पार वाढत असल्याने जनावरे उष्माघाताचे बळी ठरत आहेत. उष्माघातामध्ये जनावरांच्या शरीराचे तापमान १०३ ते १०७ अंश पर्यंत वाढते. यामूळे श्वसनाचा वेग व ह्रदयाचे ठोके वाढणे, जीभ बाहेर काढून तोंडाने श्वसन करणे, लाळ गाळणे, नाकातून स्त्राव येणे, भरपूर तहान लागणे, अस्वस्थता येणे, जनावराचा तोल जाऊन जनावर कोसळणे, झटके येणे व जनावरे दगावण्याची भिती वाढली आहे. चारा व पाण्याच्या शोधात अनेक जनावरांना उन्हाचा फटका बसत असून वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जनावरांसाठी पशुधन विभागाकडून लसीकरण व पशुपालकांना मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे.
‘समर फिव्हर’चा धोका वाढला
उन्हाच्या या तिव्रतेमुळे जनावरांची प्रजनन क्षमता कमी होणे, वजन घटणे, अतिप्रखर सुर्यप्रकाशामुळे जनावरांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील तापमान वाढल्याने जनावरांना ‘समर फिव्हर’चा धोका वाढला आहे. ‘समर फिव्हर’पासून जनावरांची वेळीच काळजी घेणे गरजेचे झाले आहे.
मोकाट जनावरे आजाराचे बळी
चारा व पाणी टंचाईमुळे अनेक पशुपालक आपली जनावरे मोकाट सोडत आहेत. शहरी भागातही अशी अनेक जनावरे मोकाट फिरताना दिसतात. या जनावरांना वेळेवर चारा व पाणी मिळत नसल्याने मोकाट जनावरे विविध आजारांचे बळी ठरत आहेत. चारा व पाण्याच्या शोधात फिरणाºया जनावरांना उन लागून झटके येणे व जनावराचा तोल जाऊन जनावर जमीनीवर कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे.
लसिकरणावर द्यावा लागणार भर
उन्हामुळे जनावरांना आजाराचा धोका वाढला असून यासाठी पशुसंवर्धन विभागाला जनावरांच्या लसिकरणावर भर द्यावा लागणार आहे. मान्सून पूर्व लसिकरण मोहिमही या पाठोपाठ राबवावी लागणार असल्याने पशुसंवर्धन विभागाला आपल्या कामाचा वेग वाढविण्याची अवश्यकता आहे.
वाढत्या उन्हामुळे जनावरांना विविध आजार उद्भवण्याची शक्यत असते. त्यामुळे पशुपालकांनी वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे. जनावरे सकाळी चारण्यासाठी सोडावी व उन्हाच्यावेळी सावलीत बांधावी. त्यानंतर त्यांना स्वच्छ पाणी द्यावे. कुठल्याही आजाराचे लक्ष आढळल्यास त्वरीत पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखवावे.
- डॉ.आर.एम.शिंदे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, बुलडाणा.