अवैध रेती उपशामुळे पूर्णा नदीवरील पुलाचा पाया धोक्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2017 03:01 AM2017-01-29T03:01:59+5:302017-01-29T03:01:59+5:30
रेतीच्या अवैध उपशाकडे महसूल प्रशासनाचे सातत्यपूर्ण दुर्लक्ष
खामगाव, दि. २८- परिसरातील रेतीच्या अवैध उपशाकडे महसूल प्रशासनाचे सातत्यपूर्ण दुर्लक्ष आहे. त्यामुळे परिसरात गौण खनिजाच्या अवैध तस्करीत दिवसेंदिवस वाढ होत असून, शेगाव तालुक्यातील भास्तन शिवारात पूर्णेच्या पात्रातून चक्क पुलाच्या पायाजवळच रेती माफियांकडून रेतीचे अवैध उत्खनन सुरू आहे. त्यामुळे पुलाचा पायाच धोक्यात सापडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
विदर्भातील महत्त्वपूर्ण नद्यांपैकी एक असलेली पूर्णा नदी अमरावती, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातून वाहते. मोठय़ा पात्रामुळे या नदीला गौण खनिजाचा समृद्ध असा वारसा लाभला आहे. दरम्यान, पूर्णा नदीसोबतच इतरही उपनद्यादेखील बुलडाणा जिल्ह्यात आहेत. घाटाखालील विविध तालुक्यांमध्ये असलेल्या नदी आणि नाल्यामुळे रेती तस्करीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. घाटाखालील संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव, मलकापूर, नांदुरा आणि खामगाव तालुक्यात असलेल्या नद्यांमधून रेती चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, शेगाव तालुक्यातील भास्तन शिवारात चक्क पुलाच्या पायानजीकच रेतीचा उपसा केला जात आहे. मोठय़ा प्रमाणातील रेतीच्या उपशामुळे पायानजीक १५- २0 फुटाचा खड्डा पडला आहे. त्यामुळे या पुलाचा पाया कमकुवत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.