प्रति जेजुरी खामगावात खंडेरायाची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 11:53 AM2019-12-29T11:53:19+5:302019-12-29T11:53:34+5:30
नवरात्रोत्सवानिमित्त श्री खंडेरायाची भव्य मिरवणूकही शहराच्या विविध मार्गावरून काढण्यात आली.
यळकोट यळकोट जय मल्हार!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : 'यळकोट यळकोट जय मल्हार', 'सदानंदाचा यळकोट यळकोट', 'खंडेराव महाराज की जय हो' असा जयघोष करीत शेकडो भाविकांनी श्री खंडोबा नवरात्रोत्सवानिमित्ताने शिवाजी वेस भागातील पुरातन श्री खंडेराव महाराज मंदिरात दर्शनाचा लाभ घेतला. शेकडो भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावलेल्या होत्या. दरम्यान, नवरात्रोत्सवानिमित्त श्री खंडेरायाची भव्य मिरवणूकही शहराच्या विविध मार्गावरून काढण्यात आली.
येथील श्री शिव खंडोबा भक्त मंडळाच्यावतीने रविवारी सकाळी श्री खंडेरायाचा नवरात्रोत्सवा विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सकाळी आरतीनंतर श्री खंडेरायाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत खंडोबाची शिखर काठी सर्वात अग्रभागी होती. यावेळी भाविकांच्या कपाळावर हळदीचा भंडारा लावून, तसेच प्रसादाचे वाटप केले जात होते. मंदिर परिसरात वाघ्या-मुरळी यांनी खंडेरायाच्या गाण्यांवर ठेका धरला होता. यावेळी हळदीचा भंडारा उधळत असल्याने मंदिर परिसर आणि मिरवणूक पिवळाधमक झालेला होता. देवाला नवसपूर्ती म्हणून वांग्याचे भरीत, बाजरीची भाकर तसेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा असल्याने भाविक मंदिरात नैवेद्य घेऊन जाताना दिसत होते. या दिवशी खंडेरायाचे दर्शन घेतल्याने मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जात असल्याने भाविकांनी रात्री उशिरापावेतो मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. (वार्ताहर)