CoronaVirus : पॉझिटीव्ह रूग्ण आढळला; खामगाव तालुक्यातील चितोडा गाव केले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 04:18 PM2020-04-05T16:18:01+5:302020-04-05T16:18:59+5:30
खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, खबरदारी म्हणून प्रशासनाने चितोडा हे गाव सिल केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोरोना या विषाणू जन्य आजाराने जगभर कहर माजविला असतानाच बुलडाणा जिल्ह्यातील ९ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यामध्ये खामगाव तालुक्यातील चितोडा येथील एक जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला. त्यामुळे खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, खबरदारी म्हणून प्रशासनाने चितोडा हे गाव सिल केले आहे.
कोरोना या विषाणूजन्य आजाराची दहशत कायम असतानाच, रविवारी खामगाव तालुक्यातील चितोडा या गावातील एक २३ वर्षीय युवक कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला. परिणामी, बुलडाणा जिल्ह्यातील रूग्णांच्या संख्येत वाढ झाली. रूग्णांची संख्या आठवर पोहोचली. त्याचवेळी दुपारी चिखलीतील आणखी एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळला. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक संकटाच्या सावटाखाली असतानाच, खामगाव तालुक्यातील जनताही भयभित झाली आहे. दरम्यान, खामगाव शहरातील दोन जणांचा अहवाल निगेटीव्ह आला असून, शहरात प्रशासनाच्यावतीने खबरदारी घेतली जात आहे.
चितोडा गाव केले सील!
दिल्ली येथील एका प्रार्थनास्थळी गेलेला युवक कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला. या युवकाचा अहवाल रविवारी सकाळी धडकताच, पोलिस आणि महसूल प्रशासनाच्यावतीने चितोडा हे गाव सील करण्यात आले. आरोग्य यंत्रणेकडून गावातील नागरिकांची तपासणी केली जात आहे. त्याचवेळी या युवकाच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेतली जात आहे.