डाक विभागाची सेवा झाली हायटेक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:33 AM2021-03-16T04:33:55+5:302021-03-16T04:33:55+5:30
मांडवा परिसरात चाेरीच्या घटनांमध्ये वाढ बिबी : येथून जवळच असलेल्या मांडवा परिसरात गत काही दिवसांपासून चाेरट्यांचा हैदाेस सुरू आहे. ...
मांडवा परिसरात चाेरीच्या घटनांमध्ये वाढ
बिबी : येथून जवळच असलेल्या मांडवा परिसरात गत काही दिवसांपासून चाेरट्यांचा हैदाेस सुरू आहे. १० मार्च राेजी चाेरट्यांनी मांडवा येथील एका घरातून १ लाख ८३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला हाेता. या प्रकरणातील चाेरट्यांचा अजूनही शाेध लागलेला नाही.
ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन योजना रखडली
धाड : संजय गांधी निराधार योजनेतील वृद्धांना गत दोन महिन्यांपासून पेन्शन मिळालेले नाही. त्यामुळे पेन्शनधारकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. पेन्शन वेळेवर देण्यात यावे, अशी मागणी आबाराव इंगळे यांनी केली आहे.
बेशिस्त वाहनांमुळे अपघातांत वाढ
मोताळा : मोताळा-नांदुरा आणि मोताळा-मलकापूर रस्त्यांवर छोट्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने वाहतूककोंडी होत आहे, तसेच रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात वाहने उभी राहात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
कलापथकाद्वारे जनजागृती अभियान
बुलडाणा : भारतीय लोककला केंद्र भादोला यांच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यामध्ये शाहीर प्रभाकर गवई, शाहीर धम्मरत्न गवई, मोहन सरकटे, संदेश हिवाळे, शेषराव गवई, प्रमोद गवई, जालिंदर इंगळे, किशोर ठेंग, संघरक्षक गवई आदींचा समावेश होता.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा
सुलतानपूर : अतिवृष्टीमुळे या वर्षी लोणार तालुक्यातही मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून, शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने मदत देण्याची मागणी हाेत आहे.
ग्रा.पं. कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवा
बुलडाणा : ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी येथे पार पडली. या बैठकीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला.
कठोर कायदे बनविण्याची मागणी
बुलडाणा : पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यात महिलांवरील अत्याचारांत वाढ होत आहे. या घटनांना पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कठोर कायदा बनवावा, अशा मागणीचे निवेदन मातृशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांकडे पाठविले आहे.
राज्य उपाध्यक्षपदी हिवाळे यांची निवड
बुलडाणा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमाेक्राॅटिकच्या राज्य उपाध्यक्षपदी प्रा. एस.पी. हिवाळे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच जिल्हाध्यक्षपदी रज्जाकभाई कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
वृक्षताेडीकडे दुर्लक्ष
डोणगाव : येथून जवळा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या बाभूळ, लिंब व इतर वृक्षांची खुलेआम कटाई सुरू आहे. याकडे स्थानिक प्रशासन व वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
नाफेडची खरेदी सुरू : शेतकऱ्यांना दिलासा
बुलडाणा : जिल्ह्यात नाफेडच्या वतीने हरभरा खरेदीस सुरुवात झाली आहे. विविध केंद्रांवर खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या शेतकऱ्यांनी माेठ्या प्रमाणात हरभरा काढणीस सुरुवात केली आहे.
भारनियमनाचा रब्बी पिकांना फटका
किनगाव राजा : तब्बल आठ ते दहा तासांचे भारनियमन करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करून सिंचन करावे लागत आहे. शिवाय शेतकरी जीव धोक्यात घालून रात्रीला सिंचन करीत आहेत. याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
धामणगाव परिसरात कुत्र्यांना चर्मरोगाची लागण
धामणगाव धाड : धामणगावसह परिसरातील अनेक गावांत गत काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांना चर्मरोगाची लागण झाली आहे. हे खरूजसदृृृृश जखमांनी माखलेले मोकाट कुत्रे गावातील परिसरात सैरावैरा फिरत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. त्यापासून संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे.